मुंबई : कोरोनाच्या संकटाची छाया देशावरून दूर जात नाही तोच आणखीही काही संकटांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. हे संकट आहे चक्रीवादळाचं. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार सध्या जवाद (Cyclone Jawad) या चक्रीवादळाची भीती काही राज्यांना आहे.
गुजरातमध्ये कहर केल्यानंतर आता हे वादळ पश्चिम बंगाल,ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागांच्या दिशेनं पुढे सरकू लागलं आहे.
4 डिसेंबरला हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकणार आहे. ज्यामुळं पश्चिम बंगालपासून आंध्रपर्यंत जोरदार पावसाटचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वादळाचं संकट पाहता सध्या किनारी भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.
चक्रीवादळाच्या सावटामुळं सध्या एनडीआरएफच्या टीम विविध ठिकाणी सक्रिय झाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये वादळाचा तडाखा तीव्र होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं त्या भागात सर्व यंत्रणा सतर्क आहेत.
कोलकात्यासह 7 जिल्ह्यांमध्ये यावेळी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. मासेमारांनाही नौका किनाऱ्यावर आणण्यास सांगण्यात आलं असल्याचं कळत आहे.
100 किमी प्रतीतास वेगानं वाहणार वारे
हवामान खात्याच्या माहितीनुसार जवाद (Cyclone Jawad) चक्रीवादळ धडकल्यानंतर प्रतीतास 100 किमी वेगाने वारे वाहणार आहेत.
हा इशारा पाहता ओडिशातील गजपती, गंजम, पूरी आणि जगतसिंहपूर या भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, केंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागढ, कंधमाल, रायगडा, कोरापूट या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रेल्वेवरही थेट परिणाम
चक्रीवादळाचा धोका पाहता ईस्ट कोस्ट रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 3 आणि 4 डिसेंबर या काळादरम्यान, 95 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय़ प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, वादळाच्या सावटाचे पडसाद गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातही दिसून आले. काही भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. सध्याच्या घडीला राज्यात पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरीही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.