नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत शिंदे यांनी सुरुवातीला राहुल शेवाळे यांचा गटनेते आणि भावना गवळी यांना प्रतोद म्हणून उल्लेख केला. शिवसेनेचा गट स्थापण करण्याबाबतचं पत्र या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिल्याची माहितीही शिंदेंनी दिली. (chief minister eknath shinde addressing press confrece at new delhi with shiv sena 12 mp)
सर्व बारा खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करुन 12 खासदारांचं पत्र दिलं आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांचं स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन केलं.
जी भूमिका 50 आमदारांनी घेतली त्याला राज्यभरातून स्वागत केलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने त्याचं समर्थन केलं आहे. कारण आम्ही एकत्र लढलो होतो. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवं होतं ते, आता झालं, जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकहिताचे निर्णय आमचं सरकार घेतंय, केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारला पाठिंबा मिळतोय. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र काम करतं तेव्हा त्या राज्याचा विकास आणि उत्कर्ष होत असतो. त्यामुळे मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो.
लाखो मतांनी निवडून येणाऱ्या खासदारांनीही या भूमिकेचं स्वागत केलं आहे. या महाराष्ट्रात लोकांसाठी जे चांगलं काम करता येईल त्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही.
दिल्लीत येण्याचं दुसरं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाची उद्या सुप्रीम कोर्टात केस आहे त्यासंदर्भात वकिल, तज्ज्ञांशी चर्चा केली. यासाठी दिल्लीत आलो होतो.
शिंदे गटाला पाठिंबा असलेले शिवसेनेचे 12 खासदार
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे आणि प्रतोद भावना गवळी, खासदार कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे यांची नावं घेतली.