प्रताप नाईक, झी मीडिया, बंगळुरु : एकीकडे कर्नाटक काँग्रेसचे मंत्री पक्षाध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिल्याचं सांगत आहेत. पण दुसरीकडे काही मंत्री गरज असेल तरच मंत्रीपदाचा राजीनामा देवू असं सांगत आहेत. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कर्नाटकमधील सर्व मंत्री उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. या बैठकीनंतर काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार हे समोर येईल.
कर्नाटकमधली ही स्थिती भाजपने घडवून आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर भाजपने हा आरोप फेटाळला आहे. राहुल गांधींनीही राजीनामा दिला त्यालाही भाजपाच जबाबदार आहे का? असा टोलाही भाजपाने लगावला आहे.
काँग्रेसच्या कर्नाटकमधील सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या २२ मंत्र्यांनी राजीनामे पक्षाच्या अध्यक्षांकडे दिले आहेत. पक्षाच्या हितासाठी राजीनामे दिल्याचं सांगितलं जातं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सर्व काँग्रेस नेते पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे देखील उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. सध्या कर्नाटकात घडामोडी पाहायला मिळत आहे. सरकार पडणार की नाराज आमदारांना परत आणण्यात सरकारला यश मिळणार हे काही वेळेतच स्पष्ट होणार आहे.