बंगळुरु : कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागलीय. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते एच. के. पाटील यांनी नाराजी दर्शवलीय. याप्रकरणी त्यांनी सिद्धारमैय्या यांना पत्र लिहून तातडीची बैठक बोलवण्याची मागणी केलीय.
तसचे एच. के. पाटील यांनी कुमारस्वामींना पत्र लिहून आपला बजेटवरून आपला संताप व्यक्त केलाय. या बजेटमध्ये अल्पसंख्याक समुदायासाठी विशेष असं काहीच नाही तर उत्तर कर्नाटकमधील जनतेची यातून निराशा झाल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय.
२०१८ सालच्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाला जिंकण्यासाठी अल्पसंख्याक समाजाची मदत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी बजेटमध्ये खास तरतूद हवी होती. बजेटच्या चर्चेवर उत्तर देताना कुमारस्वामींनी अशी घोषणा करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. उत्तर कर्नाटकमधल्या नागरिकांना या बजेटकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण या नागरिकांची निराशा झाल्याचं पाटील म्हणाले. त्यामुळे काँग्रेसने तातडीची बैठक घेऊन यावर तोडगा काढला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केलेय.