तिरुवअनंतपुरम : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतात दहशतवादाविरोधीच्या वातावरणाची लाट उसळली. दहशतवादी कारवायांचं समर्थि करण्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवरही अनेक राष्ट्रांचा रोष ओढावला. यामध्येच आता सर्व घटनांचे पडसाद राजकारणासोबतच कला आणि क्रीडा विश्वावरही उमटत आहेत. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानसोबत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या क्रीकेट विश्वचषकात खेळावं की नाही, याविषयीसुद्धा साशंकतेचं वातावरण दिसत आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी याविषयी त्यांचं मतच मांडत भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना व्हावा अशी भूमिका मांडली.
'१९९९ मध्ये कारगिल युद्धं झालं त्या वर्षीही भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात पाकिस्तानशी खेळला आणि जिंकलासुद्धा. त्यामुळे यंदाच्या वर्षीही विश्वचषकात पाकिस्तानशी खेळावं. असं न केल्यास शत्रूशी दोन हात करण्याआधीच शरणागती पत्करली असं प्रतित होईल', असं ते ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हणाले. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघ, बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीत आगामी काळातील क्रिकेट सामन्यांविषयी काय निर्णय होतो, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानशी न खेळण्याच्या निर्णयाविषयी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही आपली प्रतिक्रिया देत सामना खेळत पाकिस्तानचं विश्चचषकातील आव्हान संपुष्टात आणावं, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय आपण देश आणि सरकारच्या निर्णयासोबतच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
#WATCH Shashi Tharoor says, "In '1999 Kargil War, India played Pakistan in the cricket World Cup, & won. To forfeit the match this year would not just cost two points: it would be worse than a surrender, since it would be defeat without a fight." pic.twitter.com/yRIExUVJ4c
— ANI (@ANI) February 22, 2019
बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीने या सर्व प्रकरणाचा निर्णय घेण्याची अंतिम जबाबदारी ही भारत सरकारवर सोपवली आहे. त्यामुळे यावर भारत सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीमध्ये आयसीसीची दुबईमध्ये बैठक होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नका, असं भारत सरकारनं सांगितलं तर आयसीसीच्या या बैठकीत हा मुद्दा उचलला जाऊ शकतो.