नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयोजित केलेल्या व्याख्यानावर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बहिष्कार घातला. पण त्यामुळे काँग्रेसनं भूमिका मांडण्याची संधी सोडली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. संघ काय आहे, संघाची कार्यपद्धती कशी आहे, संघाचं स्वातंत्र्य संग्रामातलं योगदान काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीन दिवसीय व्याख्यान आयोजित केलंय.
या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, ममत बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, मायावती, अखिलेश यादव, प्रकाश करात, सीताराम येुचुरी यांसह सर्वच पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आलं होतं. शशी थरूर यांच्यासारख्या बुद्धीजीवींनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रश्नाच्या माध्यमातून काँग्रेसची भूमिका मांडायला हवी होती, असा सूर काँग्रेसच्या गोटात आहे.
पहिल्याच दिवशीच्या व्याख्यानात मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान असल्याबद्दल कौतुक केलं. त्याचबरोबर संघाचा तिरंग्याबद्दलचा आदर आणि संघात रुजलेली लोकशाही याबद्दलही विवेचन केलं. संघानं २०१५ मध्ये पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकावला. त्यामुळे भविष्यातील भारताबद्दल संघाचा उद्देश कसा स्वच्छ असेल, हे पाहणे गरजेचे आहे, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
यापूर्वी संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित होते. त्यावरुन प्रणव मुखर्जींवर टीकाही झाली. त्यानंतर मात्र विचारांची घेवाण देवाण ही भारताची संस्कृती आहे, असं म्हणत काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला. पण संघाच्या या कार्यक्रमाला मात्र काँग्रेसचा एकही नेता उपस्थित राहिला नाही. मतभेदांचं आणि द्वेषाचं राजकारण असंच सुरू राहिलं तर भविष्यातला भारत घडणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.