काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांनी त्यांच्या ठिकाणांवर 350 कोटींची रोख रक्कम सापडल्यानंतर अखेर मौन सोडलं आहे. आपलं कुटुंब सगळा व्यवसाय सांभाळत असून, जो पैसा सापडला आहे तो थेट त्यांचा नसून ज्या कंपन्यांवर धाड टाकण्यात आली त्यांचा आहे असा दावा त्यांनी केला आहे. तसंच हा पैसा काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.
प्राप्तिकर विभागाने 6 डिसेंबरपासून बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि धीरज साहू यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या संस्थांविरुद्ध सुरु केलेली कारवाई अखेर शुक्रवारी संपली. ओडिशा आणि झारखंड येथे हे छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान 353.5 कोटींची रोख रक्कम सापडली होती. भारतातील कोणत्याही तपास संस्थेने केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे.
धाड टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना कपाट पैशांनी भरलेली आढळली. घरांमध्ये सगळीकडे पैसाच पैसा असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. भाजपाने यावरुन काँग्रेसला लक्ष्य करत भ्रष्टाचाराचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'मनी हाईस्ट' वेब सीरिजचा उल्लेख करत काँग्रेसला टोला लगावला होता.
दरम्यान एएनआयशी बोलताना धीरज प्रसाद साहू म्हणाले आहेत की, आपण 35 वर्षांपासून राजकारणात असून पहिल्यांदाच आपल्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. "मी दुखावलो आहे. मी ठामपणे सांगू शकतो की, जो पैसा सापडला तो माझ्या कंपन्यांचा आहे. आम्ही मागील 100 वर्षांपासून मद्यव्यवसायात आहोत. मी राजकारणात सक्रीय असल्याने व्यवसायात जास्त लक्ष घातलं नाही. माझं कुटुंब हा व्यवसाय हाताळत होतं. मी फक्त त्यांच्याकडे व्यवसाय कसा सुरु आहे याची चौकशी करायचो," असं धीरज साहू म्हणाले आहेत.
झारखंडमधून राज्यसभेचे खासदार असणारे धीरज साहू यांनी आपलं सहा भावांचं एकत्रित कुटुंब असल्याचं सांगितलं आहे. आम्ही सर्व भाऊ या व्यवसायात आहोत. त्यांची मुलंही कंपनीचं वेगवेगळं काम पाहत असतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.
"जो पैसा सापडला आहे, तो मद्य व्यवसायात असणाऱ्या आमच्या कंपन्यांशी संबंधित आहे. आमचा व्यवसाय पारदर्शक आहे. हा पैसा मद्यविक्रीतून आला असून, यामध्ये सर्व व्यवहार रोखीत होत असल्यानेच इतकी रोख रक्कम होती. हा पैसा मद्यविक्रीतून आलेला असून काँग्रेस किंवा इतर राजकीय पक्षाशी त्याचा काही संबंध नाही. हा माझ्या कंपन्यांचा पैसा आहे," असं धीरज साहू म्हणाले आहेत.
"काही कंपन्या माझ्या नातेवाईकांशी संबंधित आहेत. मद्य निर्मिती केली जाणाऱ्या बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या आवारात कोणताही पैसा सापडलेला नाही. हा पैसा माझा नाही. हा माझ्या कुटुंबाचा पैसा माझा नसून, माझ्या कुटुंबाचा आणि संबंधित कंपन्यांचा आहे. गरज लागल्यास माझं कुटुंब प्राप्तिकर विभागाला स्पष्टीकरण देईल. आम्ही प्रशासनाला सहकार्य करु," असं धीरज साहू यांनी सांगितलं आहे.