नवी दिल्ली: मध्य प्रदेशातली काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेत भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यांनंतर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात पक्षविरोधी कारवायांमुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांची काँग्रेस पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी: अखेर ज्योतिरादित्य सिंधियांचा काँग्रेसला रामराम
KC Venugopal, Congress: The Congress President has approved the expulsion of Jyotiraditya Scindia from the Indian National Congress with immediate effect for anti-party activities. https://t.co/NpsGIvfmJR pic.twitter.com/AF10ZyqtJE
— ANI (@ANI) March 10, 2020
तत्पूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला. आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्योतिरादित्य शिंदे यांना घेऊन पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले होते. तब्बल तासभराच्या चर्चेनंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले. सध्या ते आपल्या दिल्लीतील घरी आले आहेत. मात्र, थोड्याचवेळात ते दिल्लीतील भाजप मुख्यालयात जाऊन पक्षात औपचारिकपणे प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.
त्यामुळे आता मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पडणार, हे जवळपास निश्चित आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेसमधून २० आमदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित आहे. मध्य प्रदेश विधानसभेत सध्या काँग्रेसचे ११४ आणि भाजपचे १०७ आमदार आहेत. तर बसपा २, ४ अपक्ष आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. या सर्वांनी सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर ही समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. दरम्यान, भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.