नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी कॉंग्रेला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. काँग्रेस पक्ष नेतृत्त्वावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी हल्लाबोल केलाय.
काँग्रेसमध्ये आई-मुलाशिवाय कुणालाच सत्ता मिळू शकत नाही असं सांगत सोनिया आणि राहूल गांधीवर शरसंधान साधलयं. कॉंग्रेसच्या वर्मावरच त्यांनी घाव घातल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर काँग्रेस आपल्याला मानत नसली तरी आपण काँग्रेसच्या विचारधारेशी जन्मापासून जोडलं गेलं असल्याचं सांगितलं. जिथपर्यंत आपण सक्रीय आहोत तोपर्यंत काँग्रेससाठी काम करत राहणार असल्याचं सांगितलं.
भाजपच्या पारंपरिक व्होटबँकेवर डोळा ठेऊन काँग्रेसनं नवी व्यूहरचना आखली आहे, त्यासाठी राहुल गांधींनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. आज त्यांच्या दौ-याचा दुसरा टप्पा सुरु होतोय. 9 ते अकरा ऑक्टोबर या तीन दिवसात राहूल गांधी अनेक मंदिराना भेट देणार आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी सध्या टेम्पल रनचा खेळ सुरू केला आहे. मोबाईलवर नाही, तर प्रत्यक्षात, गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, हिंदू मतं जिंकण्यासाठी काँग्रेसनं ही खास रणनीती आखली आहे. राहुल गांधींच्या गुजरात दौ-याचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या दौ-यात त्यांनी चक्क 5 मंदिरांना भेटी देऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी बोलताना त्यांनी लोकांना विचारले की, ‘गुजरातमध्ये विकासला काय झाले? खोटं ऎकून ऎकून विकास वेडा झाला आहे’. लोकांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याआधी रविवारी मोदींनी विकासाबाबत विचारल्या जात असलेल्या कॉंग्रेसच्या प्रश्नांना उत्तर दिले होते.