लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

रविवारच्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले आहेत.  

Updated: Mar 23, 2020, 03:34 PM IST
लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबई : भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या धोकादायक विषाणूचा वाढता प्रकोप पाहता केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे लॉकडाउन. परंतू सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र उल्लंघन होताना दिसत आहे. रविवारच्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

त्यासाठी लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. लॉकडाउनचं पालन न करणाऱ्यांना ६ महिन्यांचा तुरूंगवास किंवा १ हजार रूपयांचा दंड आकारण्यात येवू शकतो. सोमवारी एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली.

शिवाय पंतप्रधान मोदींनी देखील नागरिकांच्या वागणुकीवर खंत व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'अद्यापही काही लोक लॉकडाउनला गांभीर्याने घेत नाहीत. कृपया स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवा. दिलेल्या निर्देशांचे पालन करा.' असं ते म्हणाले. 

शिवाय राज्य सरकारला मी विनंती करतो त्यांनी जनतेस सूचनांचे पालन करण्यास सांगावे. असं देखील ते म्हणाले. सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जनतेने देखील याकडे गांभीर्याने पाहायला हवं. गरज नसल्यास बाहेर पडू नये. असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.