Bhopal Railway Officers Promotion Fight : विश्वास कोणत्याही नात्याची चावी असते. नातं टिकवायचं असेल तर विश्वास हवाच.. मग ते कोणतंही नातं असो, नवरा बायकोचं नातं किंवा मित्रामित्राचं नातं... विश्वास नसेल तर नात्याला अर्थ उरत नाही. असाच काहीचा प्रकार आता समोर आला आहे. मित्रानेच 22 वर्षाच्या मैत्रीला काळीमा फासण्याचं काम केलंय. प्रमोशनच्या नादात मित्राला हनीट्रॅप प्रकरणात अडवण्याचं काम सख्या मित्राने केलंय. मित्राला तब्बल 5 लाखाचा गंडा स्वत:ने आपल्याच मित्राने घातल्याचं कळाल्यावर पिडीत मित्राच्या पायाखालची जमिनच कोसळली. नेमकं काय झालं? मित्र हनिट्रॅपमध्ये कसा आढळला?
समोर आलेलं हे प्रकरण भोपाळच्या गोविंदुरा इथलं आहे. एक आरोपी नरेंद्र हनीट्रॅपमध्ये मदत करणारी काजल अन् पिडीत मित्र राहुल (नाव बदलेलं आहे) असतात. झालं असं की, 2021 च्या 30 डिसेंबर रोजी नरेंद्रच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीला नरेंद्रचे मित्र उपस्थित होते. त्याचवेळी त्याठिकाणी काजल देखील उपस्थित होती. पिडीत मित्राला सर्वजण ओळखीचे होते. मात्र, काजलची ओळख नव्हती. पार्टीमध्ये तरुणी राहुलला भेटायला आली अन् त्याच्यासोबत बोलू लागली. त्यावेळी तिने राहुलला इशारे केले त्यामुळे विवाहित राहुल अस्वस्थ झाला. त्याच पार्टीत नरेंद्रने राहुल आणि काजलची ओळख करून दिली. राहुलने जेव्हा आपबिती सांगितली तेव्हा तिला तू आवडत असेल, असं म्हणत नरेंद्रने राहुलला डिवचलं अन् दोघांचे फोन नंबर एक्सचेंज केले.
पार्टी झाल्यानंतर दोघं एकमेकांच्या संपर्कात आले. त्याचं बोलणं सुरू झालं. काही महिन्यानंतर एक दिवस अचानक काजलने राहुलला कॉल केला अन् मी तुझ्या मुलाची आई होणार आहे, असं म्हणत राहुलच्या पायाखालची जमीन सरकवली. त्यानंतर तिने राहुलकडे पैश्यांची मागणी केली. राहुलने हा सर्व प्रकार नरेंद्रला सांगितला. त्यानंतर नरेंद्रने राहुलला तिला पैसे देण्यासाठी राजी केलं. कोर्टाच्या प्रकरणात अडकायला नको, नोकरी जाऊ शकते, असं म्हणत राहुलला भयभित केलं. राहुलने काजलला पैसे दिले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला तो काजलला पैसे पाठवू लागला. मात्र, काजलच्या धमक्या कमी होत नव्हत्या.
असा झाला उलघडा
2022 च्या जुलै महिन्यात अचानक नरेंद्रची तब्येत बिघडली. त्यानंतर राहुलला समजलं की नरेंद्रला कॅन्सर आहे. नोव्हेंबरपर्यंत नरेंद्रचा इलाज सुरू होता. नरेंद्र रुग्णालयात भरती झाला अन् इकडे काजलचे धमकीचे फोन बंद झाले. नोव्हेंबरमध्ये जेव्हा नरेंद्र रुग्णालयातून बाहेर आला, तेव्हा त्याला पुन्हा काजलचे फोन येणं सुरू झालं. यावेळी मात्र राहुलला नरेंद्रवर डाऊट आला. मात्र, तो काहीही करु शकत नव्हता. दुसरीकडे राहुलच्या पत्नीला काय चाललंय याचा अंदाज आला होता. तिने राहुलला विचारलं, तेव्हा राहुलने पत्नीला झालेला सर्व प्रकार सांगितला. पत्नीने नवऱ्यावर विश्वास दाखवला अन् पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितलं.
राहुलने जेव्हा पोलिसात तक्रार केली. त्यानंतर काजल आणि नरेंद्र दोघंही फरार झाले. पोलिसांनी शोध लावल्यावर सर्व प्रकरण समोर आलं. ऑफिसमध्ये राहुलच्या प्रमोशनची चर्चा होती, मात्र त्याचं प्रमोशन झालं नव्हतं. नरेंद्रने प्रमोशनचा फायदा घेण्यासाठी मला हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकवलं, असा राहुलचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केली असून नेमकं काय झालं? याचा खुलासा अद्याप होऊ शकला नाही. पाच लाख गेले याचं दु:ख नाही, पण मित्राने घात केल्याचं मला वाईट वाटतं, असं राहुलने म्हटलं आहे.