Gujarat : गुजरातमध्ये बँक ऑफ इंडियाच्या (Bank of India) एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या (Gujarat) नडियाद शाखेत एका ग्राहकाने मनीष धनगर नावाच्या या कर्मचाऱ्याला 10 कानाखाली मारल्या. बँकेचे इतर कर्मचारी त्यांच्या मनीषला वाचवण्यासाठी आले असता ग्राहकासोबत असलेल्या व्यक्तीनेही मारहाण केली. यादरम्यान ग्राहकाने कर्मचाऱ्याला चोप देणे सुरूच ठेवले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला होता. त्यानंतर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
3 फेब्रुवारी रोजी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक ग्राहक बँक कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. ग्राहकाने कर्मचाऱ्याला अनेक वेळा मारहाण केली. आणखी लोक तिथे पोहोचताच ग्राहकाने मनीष या कर्मचाऱ्यालाही लाथ मारली. मनीष धनगरला मारहाण करण्यासाठी ग्राहकासोबत त्याच मित्रही गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
कशामुळे झाली मारहाण?
मनीष बॅंकेच्या शाखेत लोन डेस्क सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाशी संबंधित काही महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी केल्याने समर्थ नावाच्या ग्राहकाने त्याला मारहाण केली. या घटनेची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. मनीषने पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी समर्थ ब्रह्मभट्ट नावाचा ग्राहक बँकेत आला आणि त्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मला समर्थने अनेक वेळा कानाखाली आणि लाथही मारली, असेही मनीषने सांगितले. बँकेने समर्थला विमा पॉलिसीची प्रत जमा करण्यासाठी सांगितल्याचा राग मनात होता असे मनीषने पोलिसांना सांगितले. रागाच्या भरात समर्थने बँकेत येऊन मनीषला मारहाण करण्यास सुरुवात केली.
#WATCH | An employee of the Bank of India, Nadiad branch was thrashed by a customer over the issue of a bank loan on 3rd February. Case registered under SC-ST (Prevention of Atrocities Act) in Nadiad Town Police Station#Gujarat pic.twitter.com/JJbMzA2cOO
— ANI (@ANI) February 5, 2023
विमा पॉलिसीची प्रत जमा करण्यासाठी बँकेकडून समर्थला सातत्याने फोन करण्यात येत होते. बँकेकडून वारंवार फोन येत असल्याने समर्थ चांगलाच वैतागला होता. समर्थने विमा पॉलिसी जमा करणार नाही, अशी धमकी फोनवरून दिली होती. शेवटी समर्थ बँकेत आला आणि मनीषने त्याच्याकडे घराची विमा पॉलिसी मागितली, तेव्हा तो त्याच्याशी भांडू लागला.