...तर आघाड्या करायच्याच कशाला? ठाकरेंची शिवसेना संतापून म्हणाली, 'मोदी-शहांच्या...'

Uddhav Thackeray Shivsena Slams Congress And AAP: महाराष्ट्रातही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केली व एक प्रकारे शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र निर्माण झाले, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 10, 2025, 07:21 AM IST
...तर आघाड्या करायच्याच कशाला? ठाकरेंची शिवसेना संतापून म्हणाली, 'मोदी-शहांच्या...' title=
दोन्ही पक्षांवर ठाकरेंच्या सेनेचा निशाणा

Uddhav Thackeray Shivsena Slams Congress And AAP: दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवत 48 जागा जिंकल्या. तर विजयाची हॅटट्रीक साधण्याच्या प्रयत्नात असलेला माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'आम आदमी पार्टी' हा पक्ष अवघ्या 22 जागांपर्यंत पोहोचला. काँग्रेसला तर दिल्ली विधानसभेतील सलग तिसऱ्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नाही. मात्र काँग्रेस आणि 'आप'च्या या पराभवासाठी दोन्ही पक्षांमध्ये झालेला संघर्ष कारणीभूत ठरला आणि याचाच फायदा भाजपाला झाल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपलं मत नोंदवलं आहे.

भाजपचे काम या दोघांनी सोपे केले

ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीच्या निकालांवर नोंदवलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य करण्यात आलं आहे. दिल्लीतील निकालासंदर्भात जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची व अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया लक्षवेधी असल्याचं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे. ठाकरेंच्या पक्षाने, "ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलेला संताप हा व्यावहारिक आहे. दिल्लीत आप आणि काँगेस एकमेकांविरुद्ध फक्त लढलेच नाहीत, तर वाभाडे काढले. त्यामुळे भाजपचे काम या दोघांनी सोपे केले. ‘‘आपापसात मनसोक्तपणे भांडा आणि एकमेकांना संपवून टाका,’’ असा संताप ओमर यांनी व्यक्त केला तो योग्यच आहे," असं म्हटलं आहे.

हा काँग्रेसचा एक प्रकारचा अहंकार

"काँग्रेसने 14 ठिकाणी ‘आप’च्या पराभवास हातभार लावला. हरयाणातदेखील तेच झाले. ‘आप’शी भांडून शेवटी काँग्रेसच्या हाती काय लागले? काँग्रेस पक्षात अशा काही सुप्त शक्ती आहेत काय, ज्यांना राहुल गांधींच्या प्रतिष्ठेला नेहमीच तडे द्यायचे आहेत? ‘आप’ला विजयी करण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही असे काँग्रेसचे नेते म्हणत असतील तर ते चूक आहे व हा एक प्रकारचा अहंकार आहे. मग काय मोदी-शहांच्या हुकूमशाहीला विजयी करण्याची जबाबदारी ही आपापसात लढणाऱ्यांची आहे?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं या दोन्ही पक्षांना विचारला आहे.

नक्की वाचा >> माणसाने ढोंग तरी किती करावे? ठाकरेंच्या सेनेची अण्णा हजारेंवर आगपाखड; म्हणाले, 'हजारे फक्त..'

...तर आघाड्या वगैरे निर्माण करायच्याच कशाला?

"दिल्लीतील निकालाचा फटका लोकशाहीला बसणार आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केली व एक प्रकारे शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र निर्माण झाले. दिल्लीत आप व काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायलाच लढले. त्यात मोदी-शहांचे फावले. हे असेच चालणार असेल तर आघाड्या वगैरे निर्माण करायच्याच कशाला? मनसोक्त भांडा! महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या निकालाने कोणी बोध घेणार नसतील तर हुकूमशहाच्या विजयाला हातभार लावण्याचे पुण्य पदरी पाडून घ्या व त्यासाठी गंगास्नानाचीही गरज पडणार नाही," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.