Delhi San Francisco Air India flight update: विमान प्रवास कायमच खास असतो असं म्हणतात. पण, अनेकदा हाच विमानप्रवास काही कारणांमुळं धडकीसुद्धा भरवतो. एअर इंडियाच्या एका विमानातील प्रवाशांना असाच काही अनपेक्षित अनुभव आला. कारण, विमान दिल्लीहून निघालं खरं. पण, पुढं ते अपेक्षित स्थळी पोहोचू शकलं नाही. ज्यानंतर एक गंभीर कारण समोर आलं आणि प्रवाशांना संभाव्य संकटाची माहिती मिळताच आपण, त्यातून बचावलो या भावनेनं त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दिल्लीहून निघाललें एअर इंडियाचं विमान अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं लँड होणं अपेक्षित होतं. पण, गुरुवारी विमानात काही तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळं ते रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करण्यात आलं.
एअर इंडियानं X च्या माध्यमातून याविमानाच्या मार्गात बदल करण्यात आल्याची अधिकृत माहिती दिली. प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या साथीनं एअर इंडिया काम करत असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं. या विमानात 225 प्रवासी आणि 19 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. रशियात विमान लँड झाल्यानंतर त्या सर्वांना तातडीनं टर्मिनल बिल्डींमध्ये पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं.
Update #2: Air India Flight AI183
Air India flight AI183 of 18 July 2024 operating Delhi to San Francisco made a precautionary landing at Krasnoyarsk International Airport (KJA) in Russia after the cockpit crew detected a potential issue in the cargo hold area. The aircraft…
— Air India (@airindia) July 18, 2024
एअर इंडियाचं एआय 183 तांत्रिक कारणांमुळं क्रास्नोयार्स्क विमानतळावर (UNKL) लँड करण्यात आलं. दरम्यान, सुरुवातीला या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती मिळू शकली नसल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांनी चिंता व्यक्त करत एअर इंडियाशी संपर्क साधला होता. पण, सर्व प्रवासी सुखरुप असल्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला.
सॅन फ्रान्सिस्को मार्गावरील विमानांमध्ये अडचणी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा एअर इंडियाच्याच दिल्लीहून अमेरिकेला निघालेल्या विमानाला अशा प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागला होता. तांत्रिक अडचणी आणि AC व्यवस्थित काम करत नसल्यामुळं इतर काही कारणांमुळं ते विमान 30 तास उशिरानं उड्डाण भरणार होतं. दरम्यान, यावेळी उदभवलेलं संकट गंभीर होण्याआधीच वैमानिकांच्या समयसूचकतेमुळं विमानाचा मार्ग तातडीनं बदलत ते रशियाला लँड करण्यात आलं ही महत्त्वाची बाब.