पंचकूला : राम रहिमला अटक झाल्यानंतर पंचकूलामध्ये भडकलेल्या हिंसेबाबत मोठा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनुसार, हनीप्रीतने हिंसा भडकवण्यासाठी १.२५ कोटी रूपये दिले होते.
पंचकूला ‘नाम चर्चा घर’ चे इंचार्ज चमकौर सिंहने हा खुलासा केलाय. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, १७ ऑगस्टला झालेल्या मीटिंगमध्ये हनीप्रीतने चमकौरला पैसे पाठवले होते. दुसरीकडे पोलिसांनी डेरा सच्चा सौदाच्या ४५ सदस्यीय मॅनेजमेंट कमिटीला नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी या ४५ लोकांना चौकशीत सामिल होण्यास सांगितले आहे.
पंचकूलामध्ये २५ ऑगस्टला हिंसा झाली होती. यात ३० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. डेरा समर्थकांनी पत्रकारांनाही मारहाण केली होती. त्यानंतर इथे सैनिकांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. राम रहिमची मानलेली मुलगी हनीप्रीतने राम रहिमला पोलीस कस्टडीमधून सोडवण्याचा प्लॅनही केला होता. जो नंतर पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. आता ती पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे.