नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीच्या जामा मशिद परिसरातील कस्तुरबा गांधी रूग्णालयात पीजीचा अभ्यास करणाऱ्या तरूण डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद परिस्थित आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे या तरूण डॉक्टरचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. शिवाय मृतदेहा जवळून एक सुसाईट नोट देखील हस्तगत करण्यात आली. या नोटमध्ये ' आय लव्ह यू' असं लिहलं आहे. नोटमध्ये तिने स्वत: जबाबदार ठरवलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत डॉक्टरचं नाव मोनिका (२६) असं आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. आजीच्या मृत्यूनंतर ती खचून गेली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
मोनिका मुळत: तेलंगणाची राहणारी आहे. तिच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय अन्य नातेवाईक देखील आहेत. ती प्रसुती विभागात पदवीचा अभ्यास करत होती. शुक्रवारी सकाळी १०.४५च्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.
त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी त्यांना इंजेक्शन मिळाले. पोलिसांनी ते इंजेक्शन तपासणीसाठी पाठवले आहेत. शिवाय सुसाईट नोट देखील मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
'माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. आय लव्ह यू आई-बाबा. सॉरी' असं पत्र तिने लिहिलं आहे. ११ नोव्हेंबर रोजी मोनिकाच्या आजीचं निधन झालं होतं. ती आपल्या आजीवर खूप प्रेम करत होती. त्यामुळे आजीच्या निधनानंतर ती खचून गेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.