नवी दिल्ली: सय्यद शुजा या सायबर तज्ज्ञाने ईव्हीएम यंत्राच्या हॅकिंगसंदर्भात केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर भाजप नेत्यांकडून या आरोपांचा जोरदार प्रतिवाद केला जात आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीदेखील मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लंडनमधील हॅकेथॉनची स्क्रिप्ट काँग्रेसने लिहल्याचा आरोप केला. या कार्यक्रमाच्या आयोजकांचे काँग्रेसशी घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या इशाऱ्यावरच हा सारा प्रकार घडल्याचा दावा रवीशंकर प्रसाद यांनी केला.
मतदानयंत्राच्या हॅकिंगचा मुद्दा काँग्रेसच्या अंगाशी येण्याची भीती
सय्यद शुजा या अमेरिकी सायबर तज्ज्ञाने सोमवारी लंडन येथे पत्रकार परिषद घेतली. स्काईपद्वारे तो या पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. यावेळी त्याने भारतातील २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हे तर या सगळ्या प्रकाराची कल्पना असल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचेही त्याने म्हटले होते. साहजिकच या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
मात्र, रवीशंकर प्रसाद यांनी लंडनमधील संपूर्ण कार्यक्रम काँग्रेस पुरस्कृत असल्याचे म्हटले. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल काय करत होते? ते नेमके कशासाठी गेले होते? मला पूर्ण खात्री आहे की, काँग्रेस पुरस्कृत या कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठीच सिब्बल यांना पाठवण्यात आले होते. काँग्रेसच्या या कृतीमुळे देशातील जनतेने २०१४ साली दिलेल्या जनमताचा अपमान झाल्याची टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली.
ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या; हॅकरचा दावा