Aamir Khan In Serious Relationship With Mystery Woman: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान पुन्हा प्रेमात पडल्याचं वृत्त आहे. होय ही बातमी खरी आहे. अभिनेता अमिर खान बंगळुरुमधील एका महिलेचा प्रेमात पडला असून या महिलेबद्दलचा सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु असून आमिरने नुकतीच घरच्यांना तिची भेट घालून दिल्याची माहितीही समोर येत आहे.
'फिल्मफेअर'ने दिलेल्या वृत्तानुसार, 59 वर्षीय अभिनेता या मिस्ट्री वुमनबरोबर मागील काही काळापासून रिलेशनशीपमध्ये आहे. या दोघांनी नातं अगदी गांभीर्याने घेतलं असून त्यांनी तसं घरच्यांनाही सांगितल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाशीसंबंधित एका व्यक्तीने 'फिल्मफेअर'ला दिलेल्या माहितीनुसार, "आमिरची ही नवी जोडीदार बंगळुरुमधील आहे. आपण त्यांच्या खासगीपणाचा सन्मान केला पाहिजे. म्हणूनच मी तिची खासगी माहिती सांगणार नाही. मात्र मी इतकं तुम्हाला सांगू इच्छितो की त्याने त्याच्या या नव्या जोडीदाराची कुटुंबाबरोबर भेट घालून दिली आहे. ही भेट फार छान पार पडली."
आमिर खान कायमच त्याचं खासगी आयुष्य प्रकाशझोतातून दूर ठेवतो. मात्र या नव्या बातमीमुळे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. मात्र कोणीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र या बातम्या खऱ्या असल्याचं सांगितलं जात असल्याने आमिरच्या आयुष्यातील ही नवी सुरुवात असेल.
आमिरने 1986 साली रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुलंही आहेत. मुलीचं नाव इरा खान असून मुलाचं नाव जुनैद खान असं आहे. आमिर आणि रिनाने 2002 साली घटस्फोट घेतला. मात्र त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहे. रिनानंतर 2005 साली आमिरने चित्रपट निर्माती किरण रावबरोबर लग्न केलं. या दोघांनाही 2021 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना सरोगसीच्या माध्यमातून आझाद नावाचा एक मुलगा आहे. मध्यंतरी किरणबरोबरच्या घटस्फोटानंतर आमिरचं नाव फातिमा सना शेख या 'दंगल' फेम अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. मात्र ती केवळ एक अफवाच निघाली.
आता मात्र आमिर खरोखरच एका महिलेबरोबर रिलेशनमध्ये असल्याची बातमी समोर आली आहे. सध्या आमिर वरचे वर प्रसारमाध्यमांसमोर येताना दिसतोय. त्याचा मुलगा जुनैद हा 'लव्हयापा' चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. आमिरचा आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' हा आहे. हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.