2 नवी विमानतळं, IIT अन्... नितीशबाबूंच्या 'त्या' खेळीनं 2024 ला 58900 कोटी मिळालेल्या बिहारला परत लॉटरी

Union Budget 2025 Big Announcements For Bihar: बिहारला मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही केंद्रीय अर्थसंकल्पामधून अनेक गोष्टी मिळाल्यात. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 1, 2025, 01:13 PM IST
2 नवी विमानतळं, IIT अन्... नितीशबाबूंच्या 'त्या' खेळीनं 2024 ला 58900 कोटी मिळालेल्या बिहारला परत लॉटरी title=
बिहारला यंदाच्या बजेटमध्येही मोठा फायदा (प्रातिनिधिक व्हिडीओ)

Union Budget 2025 Big Announcements For Bihar: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेमध्ये सन 2025-24 साठी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये मागील वर्षाच्या अर्थसंकल्पाप्रमाणे बिहारला झुकतं माप देण्यात आल्याचं दिसून आलं आहे. मात्र जनता दल युनायटेडचे अध्यक्ष तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर केंद्र सरकार एवढं मेहरबान होण्यामागे जानेवारी महिन्यात घडलेली एक राजकीय घडामोड कारणीभूत आहे.

बिहारला काय काय मिळालं?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारसाठी केलेल्या घोषणांमध्ये बिहारमध्ये नवं ग्रीनफील्ड विमानतळ बनवण्याची घोषणा केली. पाटणा आणि बिहटा येथील विमानतळावर अतिरिक्त विमानतळं उभारली जाणार आहेत. बिहरमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून आता मखाना उत्पादकांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अर्थमंत्र्‍यांनी मखाना उत्पादन आणि संवर्धनासाठी चालना मिळणार असल्याचं सांगितलं. 

बिहारमधील शेतकऱ्यांनाही होणार फायदा

निर्मला सीतारमण यांनी भाषणामध्ये मिथिलांचलच्या पश्चिमेकडील कोसी कालवा परियोजनेसाठी आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा केली. याचा फायदा या भागात 50 हजार हेक्टरवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच आयआयटी पाटणा या संस्थेचा विस्तार केला जाणार असल्याचं अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलं आहे. या संस्थेमध्ये नवीन हॉस्टेल उभारली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. 

फूड प्रोसेसिंगला मिळणार चालना

तसेच राष्ट्रीय खाद्य प्राऔद्योगिक उद्मशिलता आणि प्रबंधन संस्थाची स्थापना बिहारमध्ये केली जाणार आहे. या फूड टेक्नोलॉजी इंस्टीट्यूटमुळे पूर्व भारातामध्ये फूड प्रोसेसिंग उद्योगांना चालना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. तसेच तरुणांना कौशल प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

कोणती राजकीय घडामोड कारणीभूत?

गेल्या महिन्यात जनतादल युनायटेडच्या मणीपूर प्रदेशाध्यक्षांनी मणीपूर सरकारमधून सपोर्ट काढण्याचा ट्रेलर दाखवला होता. केवळ एक आमदार असलेल्या जदयूने दिलेल्या या इशाऱ्याचा मणिपूरमधील भाजप सरकारला फारसा फरक पडला नाही. मात्र जदयूच्या प्रदेशाध्यक्षांच्या पत्रामुळे बराच गोंधळ उडाला. शेवटी संबंधित प्रदेशाध्याला काढून टाकण्याच्या निर्णय नितीश कुमार यांना घ्यावा लागला. भाजपला समर्थन कायम ठेवणार अशी घोषणा नितीश कुमार यांना करावी लागली. मात्र पाठिंबा काढून घेण्याचं हे दबावतंत्र बिहारच्या पथ्यावर पडल्याचं आजच्या अर्थसंकल्पावरुन स्पष्ट होत आहे.

मागील वर्षी दिलेले 58,900 कोटी

विशेष म्हणजे मोदी सरकारला समर्थन दिल्यानंतरच्या 2024 च्या अर्थसंकल्पामध्येही बिहारसाठी केंद्र सरकारने तिजोरी खुली केली होती. पर्यटन, पायभूत सुविधा आणि इतर अनेक क्षेत्रांच्या माध्यमातून 2024 साली मोदी सरकारने बिहारला 58,900 कोटी रुपये दिले होते.