नवी दिल्ली : सुप्रसिद्ध पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याबाबत तीव्र शब्दात टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविणे हे देशाची सर्वात मोठी चूक होती, असे वक्तव्य शौरी यांनी केले आहे. विद्यमान भाजप सरकार हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर सरकार असल्याची टीकाही शौरी यांनी केली आहे.
अरूण शौरी हे अटलबिहारी वाजयपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात असलेल्या अघाडी सरकारमध्ये मंत्री होते. आपण आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत इतके कमजोर सरकार पाहिले नाही. जे केवळ असत्याचे राजकारण करते. पंतप्रधान मोदींना आम्ही पंतप्रधान केले खरे. पण, ही देशाची सर्वात मोठी चूक होती. ते जनतेच्या भल्याचे नव्हे तर, केवळ स्वार्थाचे राजकारण करतात, असे शौरी यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना अरूण शौरी यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, खोटारडेपणा हीच मोदी सरकारची खरी ओळख आहे. मोदी सरकार अत्यंत संवेदनशील आहे. जे आपल्यावरील टीका जराही सहन करत नाही. पंतप्रधानांप्रमाणेच महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील मुख्यमंत्र्यांनीही सत्ताकेंद्र आपल्या मर्यादीत वर्तुळात पर्यायाने आपल्याकडेच ठेवले आहे. विकास ही मोदी सरकारची ओळख नाही. तर, खोटेपणा हीच मोदी सरकारची ओळख आहे. सरकारच्या खोटेपणाची अनेक उदारहणे मी देऊ शकतो. जसे की, वृत्तपत्रात पूर्ण पानभर जाहिराती देऊन सरकारने मुद्रा योजनेच्या माध्यमातून साडे पाच कोटीपेक्षाही अधिक नोकऱ्या दिल्याचा आकडा जाहीर केला. पण, वास्तव तसे नाही.
दरम्यान, शौरींनी असेही म्हटले की, मोदी सरकारमधील नेत्यांना चेहरा नाही. खरे तर नेत्यांना चेहऱ्याने ओळखले जात नाही. तर, ते जनतेच्या बाजूने काम करतात की नाही यावर ओळखले जाते. शौरी यांनी महात्मा गांधी यांचे उदाहरण देत म्हटले की, व्यक्ती काय करते हे पाहू नका पण, तुम्ही त्याचे चारित्र्य जरूर पाहा, असेही शौरी म्हणाले. दरम्यान, खास करून आर्थिक मुद्द्यांवरून भाजप सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतीय जनता पक्षाला चांगलेच 'अच्छे दिन' आले आहेत. निवडणुका जिंकण्याचा सिलसिला कायम ठेवत मग मोदींनीही निर्णयाचा धडाका लावला. या निर्णयावरून पंतप्रधान मोदींना पाठिंबा आणि विरोध अशा दोन्ही क्रिया-प्रतिक्रीया मिळत गेल्या. पण, विशेष असे की, मोदींना मिळणारा पाठिंबा हा सर्वसामान्य नागरिकांतून आहे. तर, होणारा विरोध प्रामुख्याने बौद्धिक वर्तुळातून.