गोरखपूर : प्रत्येक बाप आल्या परीला मुलीला खूप जपतो. लागलं दुखलं खूपलं तिला त्रास झाला तर त्याला जराही सहन होत नाही. एका बापानं चक्क आपल्या मुलीला त्रास देणाऱ्याला आयुष्यभराची एकदाच अद्दल घडवली आहे. मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी तरुणाला कोर्ट परिसरात गोळ्या घालून कायमचं संपवलं आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला वडिलांना कोर्ट परिसरात थेट गोळ्या घातल्या. मुख्य आरोपी दिलशाद हुसेन याचा यामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कोर्ट परिसरातील पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय प्रकरण
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा दिलशाद हुसेनवर आरोप आहे. याची केस कोर्टात सुरू आहे. त्याला कोर्टात हजर करत असताना हा सगळा प्रकार घडला.वडिलांनी कायदा हाती घेऊन मुलीच्या बलात्काराचा बदला घेतला.
कुठे घडली ही घटना
हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे घडला आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी आणलं असताना त्याच वेळी पीडित अल्पवयीन मुलीच्या बापानं नराधमाच्या डोक्यात गोळी घातली. गोळी लागून आरोपी दिलशाद हुसेनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कोर्ट परिसरात घडली आहे. भागवत निषाद असं पीडित मुलीच्या वडिलांचं नाव आहे. भागवत निषाद यांनी आपल्या लाइसेंस असलेल्या बंदुकीतून आरोपीच्या डोक्यात गोळी झाडली.
पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिलशाद हुसेन हा गोरखपूरच्या बधलगंज येथील पटनाघाट तिराहा येथे निवृत्त बीएसएफ जवान भागवत निशाद यांच्या घरासमोर पंक्चरचे दुकान चालवत असे. 12 फेब्रुवारी 2020 रोजी दिलशादने त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केलं. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी भागवत यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
आरोपीच्या तावडीतूनअल्पवयीन मुलीची सुटका
12 मार्च 2021 रोजी पोलिसांनी दिलशादला हैदराबादमधून अटक केली आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. 2 महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेल्या दिलशादची पोलिसांनी तुरुंगात रवानगी केली होती.
एसएसपी विपिन टाडा यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आवारात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिलशाद हुसेन हा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी असून तो एका खटल्यासाठी गोरखपूर न्यायालयात आला होता. या घटनेनंतर वकिलांनी न्यायालयाच्या आवारात या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात केली.
पीडित मुलीचे वडील भागवत निषाद शस्त्रांसह न्यायालयाच्या आवारात कसा घुसला याची चौकशी केली जाईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. आरोपी भागवत निषादला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.