Nanded Express: रेल्व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं एक मोठी दुर्घटना घडली असती. नांदेड एक्सप्रेस ट्रेनच्या ड्रायव्हरच्या एका मोठ्या चुकीमुळं मोठा अपघात घडला असता. ग्वालियर-झांशी रेल्वेमार्गावर बुधवारी सकाळी गंगानगर नांदेड एक्स्प्रेस 42 किमी गार्डशिवाय धावली. तर, ट्रेन मॅनेजरने हिरवा झेंडा दाखवण्याआधीच ट्रेनला ग्वालियर स्थानकातून रवाना करण्यात आले. दरम्यान, रेल्वे क्रॉसिंगदरम्यान केबिन मॅनला गार्डने हिरवा झेंडा न दाखवल्यामुळं कंट्रोल रुमला सूचना दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
घडलेल्या या प्रकारामुळं रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर लगेचच डबरा स्थानकात ट्रेन थांबवण्यात आली आणि दुशर्या ट्रेनमधून गार्डला तिथे पाठवण्यात आलं. जवळपास 48 मिनिटांनंतर नांदेड एक्स्प्रेसला डबरा येथेून झांशीकडे रवाना करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
पंजाबच्या गंगानगर येथून रवाना झालेल्या नांदेड एक्स्प्रेस 12486 हुजूर साहेब नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस बुधवारी सकाळी 42 मिनिट उशीराने 3.44 वाजता ग्वालियर स्थानकात पोहोचली होती. पाच मिनिटे थांबा घेतल्यानंतर ही ट्रेन 3.49 रोजी झांशीसाठी रवाना झाली होती.
सिथौली, संदलपूर, आंतरी, अनंत पेठ येथून रवाना होत असताना रेल्वे क्रॉसिंगवर केबिन मॅनला गार्डकडून हिरवा झेंडाच दाखवण्यात आला नाही. यानंतर कॅबिन मॅनने कंट्रोल रुमला याबाबत सूचना दिली. यानंतर लोको पायलटला लक्षात आलं की रेल्वेचा गार्ड ग्वालियर स्टेशनवरुन ट्रेनमध्ये चढलाच नाही. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने लगेचच यावर कारवाई करत ट्रेन 42 किमी दूर असलेल्या डबरा स्थानकात थांबवण्यात आले. व दुसऱ्या ट्रेनमधून गार्डला डबरा येथे पाठवण्यात आले. तर 48 मिनिटे ट्रेन स्थानकातच थांबली होती.
जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वालियर स्टेशनवर ट्रेनमध्ये मालाची लोडिंग व अनलोडिंग करण्यात येत होती. त्याच दरम्यान अनावधानाने ट्रेन सुटली. त्यामुळं पुढचा सगळा गोंधळ घडला आहे. त्यानंतर दुसऱ्या गाडीने गार्डला पाठवण्यात आले. त्यानंतर गार्डने सूत्र ताब्यात घेतली आणि मग ट्रेन रवाना झाली.