नवी दिल्ली : डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणात १० - १० अशा २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अगोदर डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीमला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र कोर्टाने आता ती २० वर्षाची केली आहे.
दोन अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयच्या न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरविले होते. या निकालानंतर राम रहीमच्या अनुयायांनी ठिकठिकाणी हिंसक कारवाया केल्या. या हिंसाचारामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला.
या हिंसाचारावर भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं डोळ्यात अंजन घालणारं ट्विट केलं आहे. राम आणि रहीम सध्या 'माणूस' आणि त्याच्या या वागणुकीबद्दल काय विचार करत असेल? धर्माचं मार्केटिंग करण्याचं हे उत्तम उदाहरण आहे, असं ट्विट गंभीरनं केलं आहे.
Wonder what Ram & Rahim are thinking about the 'Insaan' & his misdeeds today! A classic case of religion marketing! #PanchkulaViolence
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 26, 2017
डेरा बाबा गुरमीत राम रहिम याला न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्यानंतर या बाबांच्या अनुयायांनी जोरदार धिंगाणा घातला. या भक्तांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. याचा परिणाम अनेक ट्रेन रद्द करण्यात झाला.
तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी ट्रेन बंद कराव्या लागल्या. त्यामुळे रेल्वेला चक्क ३३ कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. डेरा बाबाला सोमवारी (२८ ऑगस्ट) शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, अनुचित प्रकार टाळण्यासाठी २५ ऑगस्ट पासूनच काही ठिकाणी रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार, या तीन दिवसांमध्ये तब्बल ६९४ ट्रेनला फटका बसला. ज्यामुळे भारतीय रेल्वेला प्रतिदिन १० ते ११ कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले.