अनिल पाटील, झी मीडिया, गोवा : गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते... देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं... थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.
फेसाळणारे किनारे... कानाकोपऱ्यातून येणारी संगिताची धून... पार्ट्यांचा जल्लोष... गोव्यात आता थर्टीफस्टचा फिव्हर चढू लागलाय. जगभरातील्या पर्यटकांचं आवडतं डेस्टीनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय. देखण्या मंदिरांत भाविकांची वर्दळ वाढलीय. चर्च विद्युत रोषणाईन न्हाऊन निघालेत. सध्या पयर्टक या किनाऱ्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत. देशभरातला तापमानाचा पारा खाली गेला तरी गोव्यातला मात्र पारा २०-२२ अंशावरच असतो. त्यामुळे पर्यटक दिवसभर समुद्राचा मनमुराद आनंद घेताहेत. यासाठी पर्यटन खातेही विशेष प्रयत्न करते.
न्यू इयरचं सिलिब्रेशन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी इथले हॉटेल व्यवसायिक नेहमीच विशेष प्रयत्नात असतात. हॉटेल्समध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यात लाईव्ह बॅंड, डान्स, आतिषबाजी आदीचा समावेश आहे. सेलिब्रेशनची लज्जत अधिक वाढवण्यासाठी अनेक हॉटेलने आपले मेन्यू वाढवले आहेत.
जसजशी गोव्यात न्यू इयर काऊंट डाऊनची वेळ जवळ येईल तशी गोव्यात पर्यटकांची गर्दी आणखीनच वाढेल.