Government Scheme: पगार आला, पगार संपला हे असंच काय ते महिनोनमहिने सुरु असतं. यादरम्यानच पैसे गुंतवण्याची योजनाही डोक्यात असते. पण, काही केल्या पैशांची जुळवाजुळव करण्यात मात्र सध्याची पिढी काहीशी मागे पडते, आणि मग मनस्ताप झाल्यावाचून राहत नाही.
तुमच्या याच सवयींना दूर लोटत आला सरकारनं आता काही योजना आणल्या आहेत. यापैकीच एका योजनेमध्ये तुम्ही चक्क 1 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता. ही योजना आहे पब्लिक प्रोविडेंट फंड (Public Provident Fund).
सध्याच्या घडीला गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. (Government ppf Scheme how to make 1 crores of money)
500 रुपयांपासून गुंतवणूक
या योजनेमध्ये तुम्ही अवघ्या 500 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करु शकता. योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आणि प्रतिमहिना 12500 रुपये गुंतवू शकता. चांगल्या व्याजदरासह या योजनेत मिळणारा परतावाही समाधानकारक असतो. या पीपीएफची मॅच्योरिटी 15 वर्षांनी होते. पण, तुम्ही 5-5 वर्षे ती पुढे करु शकता.
व्याजदर किती ?
या योजनेअंतर्गत गुंतवणुकदारांना 7.1 टक्के इतका व्याजदर मिळतो. सरकार या योजनेअंतर्गत मार्च महिन्यानंतर दर महिन्यात व्याज देतं.
या योजनेमुळं गुंतवणुकदारांना आयकरातून सवलतही मिळते. तुम्ही सेक्शन 80 सी अंतर्गत यातून कर सवलतीचा फायदा घेऊ शकता.
1 कोटी रुपये कसे मिळणार ?
तुम्हीही या योजनेतून 1 कोटी रुपये मिळवू इच्छिता, तर सर्वप्रथम याच्या गुंतवणुकीचा काळ 25 वर्षे करावा लागणार आहे. वर्षाला 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास, त्याप्रमाणे तुम्ही 37,50,000 रुपये गुंतवाल.
सदर रकमेवर 7.1 टक्क्यांच्या व्याजदरानुसार 65,58,012 इतकं व्याज होईल. मेच्योरिटीपर्यंत ही रक्कम 1,03,08,012 रुपये इतकी झालेली असेल. गणित सोपं आहे, गरज आहे ती म्हणजे फक्त समजुतदारपणे गुंतवणूक करण्याची.