नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये पाठवण्यात येणार आहे.
भारतीय कॅबिनेट मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये जाणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटच्या उच्च स्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या मंत्र्यांमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंग पुरी, जनरल व्हीके सिंग आणि किरेन रिजिजू युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी आज (सोमवार) युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली. ज्यामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याबाबत चर्चा करण्यात आली.
-
युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी स्वतंत्र ट्विटर हँडल सुरू करण्यात आलं आहे. @opganga नावाच्या या हँडलवर थेट माहिती देता येणार आहे. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अजूनही हजारो भारतीय अडकलेले आहेत.
युक्रेन संकटावर पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत भारतीयांच्या सुटकेसाठी मोदींनी चर्चा केली. युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले आहेत. त्यातील 18 हजार विद्यार्थी आहेत. युद्ध पेटल्यानं भारतीय संकटात अडकले आहेत. त्यामुळे भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.