Suicide in Gujarat: शालेय साहित्य घ्यायला पैसे नाहीत म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपुर्वी नांदेडमधून समोर आली होती. मुलाच्या पाठोपाठ बापानेही आपलं आयुष्य संपवलं होतं. लहान मुले खूप संवेदनशील असतात. गुजरातमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे तुम्हालाही वेदना होऊ शकतात.
गुजरातमधील सुरतमध्ये गोदादरा परिसरातील आठवीच्या विद्यार्थिनीने तिच्या घरी आत्महत्या केल्याची एक दुःखद घटना समोर आली आहे. शाळेची फी भरू शकत नसल्यामुळे तिला परीक्षेला बसू न दिल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 'शाळेने लहान मुलीला दिवसभर वर्गाबाहेर उभे करून शिक्षा केलीय ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि घाबरली. त्यानंतर तिने शाळेत जाणे बंद केले. 21 जानेवारी रोजी तिचे आईवडील कामावर असताना तिने आत्महत्या केली.' मृत विद्यार्थीनीच्या पालकांनी असा दावा केला आहे.
'माझ्या मुलीला शाळेत परीक्षेला बसू दिले गेले नाही. तिला वर्गाबाहेर उभे केले गेले. घरी आल्यावर ती रडत होती आणि फी न भरल्याबद्दल मला मारहाण केली जात असल्याचे ती सांगत होती. मला परीक्षा देण्याची परवानगी नव्हती, असेही तिने सांगितले. मी पुढच्या महिन्यात फी भरेन, असे मी तिला सांगितले होते. पण या घटनेनंतर तिने शाळेत जाण्यास नकार दिला असे विद्यार्थीनीच्या वडिलांनी सांगितले.
वडिलांनी केलेल्या आरोपांवर शाळेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शाळेने कोणतेही चुकीचे काम केले नाही. आमच्यावर करण्यात आलेले दावे निराधार असल्याचे शाळेचे प्रशासक मुकेशभाई यांनी म्हटले. 'आम्हाला आज सकाळीच या घटनेची माहिती मिळाली. शाळेचा या घटनेशी काहीही संबंध नाही. फीमुळे तिने आत्महत्या केली असा दावा करणे चुकीचे आणि पूर्णपणे निराधार आहे, असल्याचे मुकेशभाई म्हणाले.
शाळा विद्यार्थ्यांना फीबद्दल माहिती देत नाही. फी थकबाकीबद्दल चर्चा फक्त पालकांशीच केली जाते. आम्ही फीबद्दल तपशील देतो. फी भरण्याची तारीख निश्चित करतो. जर काही प्रतिसाद नाही मिळाला तर आम्ही थेट पालकांशी संपर्क साधतो. त्यामुळे या घटनेचा शाळेशी काहीही संबंध नाही, असे शाळेच्या प्रशासकांनी सांगितले.
शाळेतील शिक्षिका रंजनबेन अहिर यांनीही या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्यक्त केले. 'तूझी फी भरण्यात आलेली नाही असे मी त्या विद्यार्थीनीला 8 जानेवारीला सांगितले. आम्ही तिच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. तिने मला पुन्हा फोन करायला सांगितले. म्हणून मी फोन केला पण तरीही तो फोन उचलला गेला नाही. मी तिला परीक्षा देण्यास सांगितल्याचे शिक्षिका रंजनबेन अहिर यांनी सांगितले. मुलीच्या आत्महत्येचा शाळेशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुलीचे शेजारच्या कोणाशी तरी भांडण झाले होते आणि तिच्या कुटुंबाने तिला खोलीत बंद केले होते. कदाचित तिच्यावर अत्याचारही केले असतील असे दिसते. या प्रकरणाची चौकशी सुरु असून शिक्षण विभाग आणि पोलिस सत्य शोधत असल्याचेही शिक्षिकेने पुढे सांगितले.
(Desclaimer: जीवन मौल्यवान आहे. ते पूर्ण जगा. त्याचा पूर्णपणे आदर करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीमुळे, समस्येमुळे किंवा घटनेमुळे दुःखी असाल तर जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट काळ येत राहतात आणि जात राहतात. परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तीव्र निराशा, निराशा किंवा नैराश्य जाणवते तेव्हा सरकारने दिलेल्या 9152987821 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.)