Gujarat News: गुजरातच्या सूरतमध्ये एका अल्पवयीन मुलीने एकतर्फी प्रेमातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सूरताच्या वराछा येथील ही घटना आहे. 17 वर्षांच्या तरुणीने तिच्या प्रियकरासोबत गच्चीवरुन उडी घेण्याचा प्लान बनवला होता. त्यानुसार दोघंही घराच्या गच्चीवर गेले. मात्र आयत्यावेळी प्रियकराने कच खाल्ली आणि त्याने गच्चीवरुन उडी मारण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने एकटीनेच गच्चीवरुन उडी मारली
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी तिच्या प्रियकरासह तिसऱ्या मजल्यावर गेली. तिथे गेल्यावर दोघांनीही आत्महत्या करण्याचा विचार केला. मात्र आयत्यावेळी प्रियकर घाबरला आणि त्याने उडी घेण्यास नकार दिला. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावरुन तरुणीने छतावरुन उडी घेतली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयात डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर कळलं की, तरुणी सहा आठवड्यांची गर्भवती आहे. आत्महत्या करण्यापूर्वीच तरुणीला कळलं होतं की, तिच्या प्रियकराची दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा झाला आहे. त्यावरुनच त्यांच्यात मोठा वाद झाला. प्रियकर तिच्या घरी आला होता. तिथेच त्यांच्यात मोठा वाद झाला आणि भांडत भांडतच ते इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. तिथेच ही घटना घडली. पीडितेच्या पाठीला आणि चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे.
सकाळी साधारण 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुलीच्या प्रियकराचे नाव सोहम गोहिल आहे. वराछा पोलिसांकडून तरुणीच्या प्रियकराविरोधात पोक्सोअंतर्गंत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
पीडित तरुणीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची आणि प्रियकराची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर प्रियकराने तरुणीला घरी बोलवून तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसंच, तिच्यासोबत शारिरीक संबंध निर्माण केले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.