Gyanvapi ASI Survey: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परवानगी दिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व खात्याकडून (ASI) सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर चाललेल्या या सर्वेक्षणात मुस्लीम पक्षकारही सहभागी झाले होते. त्यांचे पाच लोक एएसआयच्या पथकासह उपस्थित होते. पण शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणात ते गैरहजर होते. दरम्यान, सर्वेक्षणात या जागी मंदिराच्या खुणा दर्शवणारे काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. येथे मूर्तीचे काही अवशेष सापडले आहेत. पण आम्हाला लवकरच अनेक मूर्ती सापडतील असा विश्वास हिंदू पक्षकारांचे वकील सुधीर त्रिपाठी व्यक्त करत आहेत.
सुधीर त्रिपाठी यांनी मशिदीच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे सर्वेक्षण वजूखान्यावर जास्त केंद्रीत असल्याचं म्हटलं आहे. याच ठिकाणी मुस्लीम प्रार्थना करतात. एएसआयचं पथक सकाळीच सर्वेक्षणासाठी दाखल झालं होतं. शनिवारी झालेलं हे सर्वेक्षण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होतं. यानंतर अधिकारी परिसरातून रवाना झाले.
हे सर्वेक्षण रविवारीही कायम सुरु राहणार आहे, जेणेकरुन 17 व्या शतकात खरंच हिंदू मंदिर पाडून ही मशीद उभारण्यात आली होती का याची माहिती मिळेल. एएसआय पथकाने दुपारी आपलं सर्वेक्षण थांबवलं होतं. यानंतर मुस्लिमांनी मशिदीत नमाज पठण केलं. यानंतर दुपारी 2.30 वाजता पुन्हा सर्वेक्षण सुरु करण्यात आलं.
VIDEO | "The ASI team is conducting survey in the central dome of mosque complex, where they have begun imaging and mapping. The ASI team has entered the 'tehkhana' (basement), which is under the possession of Vyas family, but has not entered the other basement," says Subhash… pic.twitter.com/kVluSkowYD
— Press Trust of India (@PTI_News) August 5, 2023
ज्ञानवापी येथील सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशी मुस्लिम बाजूचे लोक सहभागी झाले होते. ज्यांच्या उपस्थितीत मशिदीचे केअरटेकर एजाज अहमद यांनी मशिदीचे कुलूप उघडले. यानंतर एएसआयचे 61 जणांचे पथक मशिदीत आलं आणि वजूखाना वगळता इतर भागांचं सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. यावेळी ज्ञानवापी सभागृह, तळघर, पश्चिम भिंत, बाहेरील भिंत यांचं मॅपिंग करण्यात आलं. यादरम्यान मशिदीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. वजूखाना वगळता संपूर्ण संकुलाचे सर्वेक्षण करण्यात आले. तिन्ही घुमटांसह, पश्चिमेकडील भिंतींचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी हिंदू चिन्हांची तपासणी करत फोटो आणि व्हिडीओही काढण्यात आले. भिंतीचे दगड किती जुने आहेत याचा शोध घेण्यात आला. तसंच पश्चिमेकडील भिंतीवर त्रिशूल आणि स्वस्तिक सापडलं आहे.
#WATCH | Officials from the Archaeological Survey of India (ASI) arrive at the Gyanvapi mosque complex in Varanasi as a scientific survey of the complex continues today pic.twitter.com/dDlyahBQmo
— ANI (@ANI) August 5, 2023
"एएसआय टीम मशीद कॉम्प्लेक्सच्या मध्यवर्ती घुमटात सर्वेक्षण करत आहे, जिथे त्यांनी इमेजिंग आणि मॅपिंग सुरू केले आहे. एएसआय टीमने व्यास कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या 'तहखाना' (तळघर) मध्ये प्रवेश केला आहे, परंतु दुसऱ्या तळघरात प्रवेश केलेला नाही,” अशी माहिती हिंदू बाजूचे दुसरे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ज्ञानवापी मशिदीत एएसआय सर्वेक्षण करण्याच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची याचिका फेटाळून लावली होती. या सर्वेक्षणाला भूतकाळातील अनेक जुन्या जखमा ताज्या होतील असा युक्तिवाद मुस्लीम पक्षकारांनी केला. पण कोर्टाने सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली.
वाराणसी कोर्टाने एएसआयला 2 सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याआधी सरकारी वकिलांनी कोर्टात याचिका दाखल करत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी किमान चार आठवड्यांचा वेळ द्या अशी विनंती केली होती.
विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुस्लिम बाजूने प्रक्रियेत सहकार्य करण्यास सहमती दर्शवल्यानंतर मस्जिद समितीने सर्वेक्षणात भाग घेतला. तत्पूर्वी, मुस्लिम बाजूने शुक्रवारी सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला होता.
पहिल्या दिवशी सर्वेक्षण सुमारे सात तास चाललं. एएसआय टीमने मुख्यतः कॉम्प्लेक्सच्या आतील रचनांची मांडणी आणि प्रतिमांचे फोटो काढले आहेत.