HMPV Outbreak in china : चीनमध्ये मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या HMPVची भारतात एन्ट्री झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. HMPVचा भारतात पहिला रुग्ण आढळला असून, बंगळुरूतील 8 महिन्यांच्या मुलीला HMPVची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीला ताप आल्यानंतर तपासणी केली असता तिला HMPVची लागण झाल्याची बाब समोर आली.
दरम्यान, चीनमधील HMPV वायरस मुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभागानंही सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. घाबरू नका, पण सावध राहा असा सल्ला आरोग्य विभागानं नागरिकांना दिला आहे. शिवाय सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेशही आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आले असून, स्वच्छतेचे नियमावली पाळण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
IMA चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी झी24 तासशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार चीनमधून जगभरात थैमान घालणारा कोरोना आणि सध्या भीती निर्माण करणारा एचएमपीव्ही व्हायरस यांच्याच कोणतीही तुलना करता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
'हा विषाणू वेगानं पसरत असला तरीही तो इतकासा घातक नसून त्याचा मृत्यूदर अतिशय कमी आहे. त्यामुळं तो वेगानं फोफावत असला तरीही त्याचा मृत्यूदर फारसा वाढत नाही. 2001 मध्येच वैद्यकिय क्षेत्रानं या विषाणूचं आयसोलेशन केलं आहे. यानंतर अनेक देशांमध्ये या विषाणूच्या साथी आल्या, पण त्याचं महामारीत रुपांतर झालं नाही. त्यामुळे आताही महामारी होण्याची शक्यता असून, मृत्यूदरही कमी असल्यानं घाबरण्याचं कारण नाही', असं डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणाले.
'2001 पासूनच या आजाराची माहिती असल्यामुळं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणऊन श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांची काळजी घेतली जाते. 65 वर्षांहून अधिक वय असणारी व्यक्ती, लहान मुलं, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारी मंडळी, एचआयव्ही असणाऱ्या व्यक्तींसाठी हा आजार घातक ठरू शकतो. कोरोनाप्रमाणं सुरुवातीपासूनच या आजारात ऑक्सिजन कमी होण्याची शक्यता कमी असल्यामुळं धोका कमी आहे. असं असलं तरीही न घाबरता चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली, मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं, गर्दीमध्ये जाणं टाळणं याबाबतची काळजी घेतल्यास या विषाणूचा संसर्ग पसरणार नाही', हेसुद्धा वाचा.
सुरुवातीला सर्दी- खोकला झाल्यास त्यासाठी अँटीबायोटीक्सची गरज नसून, पूर्ण आराम आणि गर्दीत जाणं टाळणं या गोष्टींचं पालन करावं. खोकला जास्त असल्यास, ताप जास्त असल्यास आणि श्वसनास त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल व्हावं. अन्यथा या आजारपणात कोणत्याही अँटीबायोटीक्सची गरज नसून, विश्रांती, भरपूर पाणी पिणं या सवयींनीही हा आजार बरा होऊ शकतो.