ना मोदींना भेटलो, ना शाहंना भेटलो तरीही मिळालं मला मंत्रिपद- आठवले

 आपल्या पक्षाला एकतरी जागा मिळावी यासाठी आठवले यांनी मागणी केली होती.

Updated: Jun 10, 2019, 03:46 PM IST
ना मोदींना भेटलो, ना शाहंना भेटलो तरीही मिळालं मला मंत्रिपद- आठवले  title=

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांना हात घातला. मी ना मोदींना भेटलो; ना अमित शाह यांना भेटलो तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाल असे आठवले म्हणाले. त्यामुळे मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे असेही त्यांनी म्हटले आहे. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाने लोकसभा निवडणुकीत कोणतीही जागा लढवली नव्हती. आपल्या पक्षाला एकतरी जागा मिळावी यासाठी आठवले यांनी मागणी केली होती. पण तसे झाले नसले तरी त्यांचे मंत्रिपद कायम राहीले आहे. यावर त्यांनी भाष्य केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची काही दिवसांपुर्वी भेट झाली होती. यावेळी राष्ट्रवादी पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण त्यानंतर दोघांनीही हे वृत्त फेटाळले. आठवले यांनी याप्रकरणावरुन शरद पवार यांना चिमटा काढला. शरद पवार यांनी यापुढे  काँग्रेस सोबत राहू नये. त्यांनी आता NDA मध्ये यावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. शरद पवार यांची पॉवर काँग्रेस पेक्षा जास्त असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. मी इथे आहे तर पवार साहेबांचं तिथे काय काम आहे ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे विजयी खासदार यांच्या अयोध्या दौऱ्यावर आठवलेंनी टीप्पणी केली होती. उद्धव ठाकरे तिथे गेल्याने राम मंदीर होणार नाही असे आठवले म्हणाले होते. अयोध्येत राम मंदिर व्हायला पाहिजे असे माझे देखील मत आहे पण ते मंदिर कायदेशीर असावे आठवलेंनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधवे तसेच  राम मंदिर बांधत असताना मुस्लिम समाजावर दबाव टाकता कामा नये असेही ते म्हणाले.