'ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मंदी असेल तर रस्त्यावर ट्रॅफिक जाम का होते?'

भाजप खासदाराचा 'मस्त' सवाल

Updated: Dec 5, 2019, 10:05 PM IST
'ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मंदी असेल तर रस्त्यावर ट्रॅफिक जाम का होते?' title=

नवी दिल्ली: देशाला आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काहीजणांकडून वाहननिर्मिती क्षेत्रात (ऑटोमोबाईल) मंदी असल्याची हाकाटी पिटली जात आहे. वाहनांची विक्री खरोखरच घटली असेल तर मग रस्त्यावर वाहतूक कोंडी का पाहायला मिळते, असा सवाल भाजप खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांनी गुरुवारी लोकसभेत उपस्थित केला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या विषयावर लोकसभेत चर्चा सुरु असताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी सिंह यांनी कांद्याच्या वाढलेल्या दरासंदर्भातही भाष्य केले. देशात सर्वत्र कांदा महागल्याची चर्चा आहे. मात्र, माझ्या मतदारसंघात (बलिया) चला, मी २५ रुपयांत एक किलो कांदा मिळवून देतो, असे सिंह यांनी म्हटले. 

तसेच देशात आर्थिक मंदी असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. वाहननिर्मिती क्षेत्रात मंदी असल्याचे म्हटले जाते. परंतु, मग रस्त्यांवर अजूनही वाहतूक कोंडी का पाहायला मिळते? आज एका घरात पाच-सहा गाड्या आहेत. अनेकजण सकल राष्ट्रीय उत्पादनावरून ( जीडीपी) अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करतात. मात्र, जीडीपीच्या साहाय्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणे शक्य नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेत मेहनत आणि बचतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ही अर्थव्यवस्था मजबुत आहे. हे ध्यानात घेऊन सरकारने धोरणे ठरवली पाहिजेत, असा सल्लाही वीरेंद्र सिंह मस्त यांनी दिला. 

यावेळी वीरेंद्र सिंह मस्त यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेस शेतकऱ्यांशी बोलत नाही, त्यांना शेतीच्या समस्यांची जाण नाही. ते केवळ शेतीविषयक पुस्तके वाचतात. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले, याकडेही वीरेंद्र सिंह मस्त यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.