थंडीत घराबाहेर पडाल तर जिवाला मुकाल? या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

गेले काही दिवस उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे.

Updated: Jan 15, 2022, 09:19 PM IST
थंडीत घराबाहेर पडाल तर जिवाला मुकाल? या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? title=

मुंबई : राज्यात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लोक स्वेटर, मफलर घेऊन घराबाहेर पडू लागलेत. अशातच सगळ्यांची धास्ती वाढवणारा मेसेज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. ज्यामुळे लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे आणि यावर विश्वास ठेवायचा की, नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. या व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटंय ते पाहा.

गेले काही दिवस उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे. रात्री 12 ते सकाळी 8 दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे. याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणं, शरीर लुळं पडणं, पक्षाघात, ब्रेनहॅमरेज, रक्तवाहिन्या गोठणं, हार्टअटॅक, मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडणं असे विकार होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो रात्री घराबाहेर पडू नका.

खरंच थंडीमुळे इतका धोका वाढलाय का? लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं झी 24 तासच्या टीमनं डॉक्टरांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला.

काय आहे सत्य? 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजला शास्त्रीय आधार नाही. रात्री 12 ते 8 दरम्यान घराबाहेर पडू नये या माहितीत कोणतंही तथ्य नाही. आपल्या शरीराचं सरासरी तापमान 98.6 अंश असतं. कडाक्याच्या थंडीमुळे काही आजार उद्भवू शकतात, मात्र योग्य ती खबरदारी घेतल्यास काळजी करण्याचं काहीही कारण नाही.

आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे अशा मेसेजेसवर विश्वास ठेऊ नका आणि खात्री करून घेतल्याशिवाय कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नका.