नवी दिल्ली : संपूर्ण देश आज 'विजय दिवस' साजरा करतोय. १९७१ साली पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानसोबत १३ दिवस चाललेल्या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने विजय मिळवला होता. भारतीय जवानांचं शौर्य आणि साहसाला सलाम करण्यासाठी आणि त्या विजयाची आठवण कायम राहावी यासाठी दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन संपूर्ण देशाला विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच 1971 मध्ये पाकिस्तानशी दोन हात केलेल्या जवानांप्रती आदर व्यक्त केला.
Today on #VijayDiwas, we remember the indomitable spirit of the brave soldiers who fought in 1971. Their unwavering courage and patriotism ensured our country is safe. Their service will always inspire every Indian.
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2018
या युद्धात जवळपास ३ हजार ८४३ भारतीय जवान शहीद झाले होते. या युद्धात चारी मुंड्या चीत झालेल्या पाकिस्तानी सैन्यानं अखेर भारतीय लष्करांपुढे नांगी टाकत आत्मसमर्पण केलं आणि यानंतर बांगलादेश या नव्या देशाचा उदय झाला.
विजय दिवसानिमित्त सकाळी साडेआठच्या सुमारास संरक्षणमंत्र्यांनी इंडिया गेट स्थित अमर जवान ज्योती इथं जाऊन शहिदांना आदरांजली अर्पण केली.