Bishnoi gang 7 shooters : बॉलिवूज अभिनेता सलमान खानला धमकी (Salman Khan Threat) आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर (Baba Siddique Murder Case) लॉरेन्स बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi Gang) पुन्हा चर्चेत आली आहे. या घटनांनंतर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकाने लॉरेन्स बिश्नोई गँगविरुद्ध कारवाई सुरु करत देशभरातील विविध राज्यातून सात शुटर्सना अटक केली आहे. पंजाब आणि इतर राज्यातून या शुटर्सना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.
आरोपींकडून शस्त्र जप्त
तसंच लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्याला दहा लाखांच्या बक्षीसाचीही पोलिसांकडून घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केल्या प्रकरणी एनआयकडून अनमोल बिश्नोईचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरुनच सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप करत कोर्टाने दोघांचा जामीन फेटाळला.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण
मुंबईतल्या वांद्रे इथं 12 ऑक्टोबरला अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येतही अनमोल बिश्नोईचा हात असल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना घटनास्थळावरुन अटक करण्यात आली. तर हत्येचा कट रचल्याप्रकरणी पुणे, डोंबिवली आणि अम्बरनाथ इथून काही आरोपींना अटक करण्यात आली. मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत अनमोल बिश्नोईचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई कॅनाडात लपलाय. अनमोल बिश्नोईविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
लॉरेन्स गुजरातच्या तुरुंगात बंद
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. गायक सिद्धु मुसेवालाच्या हत्येतही बिश्नोई गँगचा समावेश आहे.