नवी दिल्ली : India Strikes Back भारतीय संरक्षण दलातील सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी रोजी जैश -ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हल्ला करण्यात आला. याच आत्मघाती हल्ल्याचं उत्तर देत भारतीय वायुदलाकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या जैशच्या तळावर भारतीय वायुदलाच्या मिराज २००० आणि इतर लढाऊ विमानांच्या ताफ्याने हा भेदक मारा करत शत्रूचा नायनाट केला. २६ फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
दहशतवादाचा नायनाट करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेलं हे पाऊल पाहता पाकिस्तानमध्येही आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. अतिसय गोपनीयता राखत करण्यात आलेला हा हल्ला नेमका कसा झाला करण्यात आला याचीही माहिती समोर येत आहे. झी न्यूजने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हल्ला झाला त्या भारत- पाकिस्तान सीमेनजीक असणाऱ्या परिसरातील नागरिकांनी रात्रभर बॉम्ब हल्ल्यांचा आवाज येत असल्याचा खुलासा केला आहे. रात्रभर आकाशात लढाऊ विमानांची ये- जा सुरु असल्याची कल्पना त्या स्थानिकांना आधीच आली होती. पण, एअर स्ट्राईक झाल्याची माहिती २६ फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी सकाळीच मिळाली.
India Strikes Back : वायुदलाने अशी आखली 'एअर स्ट्राईक'ची योजना
अब्दुल रहमान नामक स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार रात्रभर प्रचंड आवाज होत होता. ज्यानंतर गोळीबाराचाही आवाज येण्यास सुरुवात झाली. रात्री दोन वाजल्यानंतर होणाऱ्या हालचाली पाहता झोप येणं तर दूरच पण, बाहेर नेमकं काय सुरू आहे, याची कल्पनाही करता येत नव्हती. पण, होणाऱ्या प्रत्येक स्फोटाचा मोठा आवाज कानांवर पडत होता.
पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेजवळील परिसरात राहणाऱ्या मेंढपाळ आणि इतर स्थानिकांना नेहमीच दोन्ही देशांमध्ये उदभवणाऱ्या तणावग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागतो, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. स्थानिक मेंढपाळांनी दिलेल्या माहितीनुसार झालेल्या या सर्व प्रकारामुळे त्यांना धडकीच भरली होती. जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या या स्थानिकांनी भारतीय वायुदलाच्या कारवाईची प्रशंसा केली आहे.