नवी दिल्ली: भारतीय नौदलाकडून गोपनीय माहिती बाहेर फुटण्याचा धोका टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना फेसबुक आणि स्मार्टफोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. नौदलाचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि सैनिकांसाठी ही बंदी लागू असेल.
भारतीय नौदलातील सात कर्मचाऱ्यांना नुकतीच विशाखापट्टणम इथे अटक करण्यात आली होती. या सात नौसैनिकांचे पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपाखाली आणि हेरगिरीच्या संशयावरून आंध्र प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली होती. यानंतर आता नौदलाने कठोर पावले उचलली आहेत. हेरगिरी रोखण्यासाठी नौदलाने आपले सैनिक, अधिकारी आणि कर्मचारी यांना स्मार्टफोनच्या वापरावर आणि फेसबुकवर अकाऊंट असण्याला बंदी घातली आहे.
नौदल कर्मचाऱ्यांनी फेसबुक वापरू नये तसेच स्मार्टफोन वापरू नये यासंबंधी निर्देश जारी करण्यात आलेत. नौदल तळांवर आणि विविध नौदल आस्थापनांवर स्मार्ट फोन वापरू नयेत, असेही नौदलातर्फे सांगण्यात आले आहे.
नौदलातच नव्हे तर सर्वच सैन्य दलात हेरगिरीचा फार मोठा धोका असतो. याआधी हेरगिरीच्या काही गंभीर प्रकरणात अटकसत्रही झालंय. फेसबुकच्या माध्यमातून नौदल कर्मचाऱ्यांशी मैत्री करून माहिती चोरण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. हे टाळण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता नौदलाने हे निर्देश जारी केल्याचे समजते.