मुंबई : तुम्ही जर ट्रेननं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही प्रवास करताना तुमचा बर्थ जर मधला किंवा खालचा असेल तर तुम्हाला हे नियम माहिती असणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे त्यामुळे तुम्हाला कोणी त्रास दिला किंवा तुमच्याकडून कोणालाही त्रास होऊ नये यासाठी हे नियम माहिती करून घेणं गरजेचं आहे.
बऱ्याचदा मधल्या बर्थवर झोपण्यावरून वाद होतात हेही आपण पाहिलं असेल. या सगळ्यासाठीच आपल्याला प्रत्येक बर्थचे नियम माहिती असायला हवेत. भारतीय रेल्वेनं खास त्यासाठी काही नियम केले आहेत.
खालच्या म्हणजे लोअर बर्थवर रात्री उशिरापर्यंत लोक गप्पा मारत राहतात. त्यामुळे मधल्या बर्थवरच्या लोकांना झोपता येत नाही. जर मधला बर्थ लावला तर खाली बसलेल्या लोकांना त्रास होतो. अशा सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला हव्यात.
मिडल बर्थसाठीचा नियम काय?
मिडल बर्थवर झोपणाऱ्यांना हा नियम माहिती असायलाच हवा. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत हा बर्थ तुम्हाला उघडता येणार आहेत. सकाळी 6 नंतर हा बर्थ पुन्हा तुम्ही खाली करणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांना बसायला त्रास होणार नाही. जर तुम्हाला खालच्या बर्थचा प्रवासी असं करण्यासाठी रोखत असेल तर तुम्ही त्याला हा नियम सांगू शकता.
सकाळी 6 पर्यंत मिडल बर्थवर प्रवासी झोपू शकतात. मिडल बर्थवरचा प्रवासी जर 6 ला उठला असेल आणि तो जर खालच्या बर्थवर बसण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर खालच्या बर्थवर झोपलेल्या प्रवाशाला नियमानुसार उठणं बंधनकारक आहे.
याशिवाय रेल्वेचा हा नियम तुम्हाला प्रवासादरम्यानही मदत करू शकतो. TTE तुम्हाला रात्री 10 नंतर त्रास देऊ शकत नाही हे जाणून घ्या. रेल्वेच्या नियमांनुसार, टीटीई सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच तिकीट तपासू शकतात. मात्र, रात्री 10 नंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू होत नाही असंही रेल्वेच्या नियमात स्पष्ट करण्यात आलं आहे.