मुंबई : विविध क्षेत्रांकडून राजकारणाच्या वाटेवर वळणाऱ्या नावांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतता कुस्तीसारख्या खेळातील हा प्रसिद्ध चेहरा. हा चेहरा आहे फोगाट बहिणींपैकी एक असणाऱ्या बबिता फोगाटचा.
बबिताने आता क्रीडा जगतासोबतच तिच्या आणखी एका नव्या कारकिर्दीची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात तिला वडील महावीर सिंह फोगाट यांचीही साथ लाभत आहे. कारण तेसुद्धा भाजप प्रवेशासाठी सज्ज आहेत. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
यापूर्वी बबिताने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाचा प्रचार केला आहे. तर, महावीर फोगाट हे जेजेपीच्या क्रीडा फळीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता या दोघांचाही भाजपमध्ये रितसर प्रवेश होणार आहे.
हरियाणा येथे यंदा विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याच धर्तीवर सत्ताधारी भाजपकडून पक्ष बळकटीसाठीचे प्रयत्न सुरु आहेत. यंदाच्या निवडणुकांमध्ये ९० जागांसाठी भाजपकडून ७५ हून अधिक उमेदवारांना यश मिळवून देण्यात येण्याचा मानस आहे.
दुष्यंत चौटाला यांचा पक्ष जननायक जनता पार्टी म्हणजेच जेजेपी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युती झाली आहे. ज्यानुसार जेजेपी ५० आणि बसपा ४० जागांवर निवडणूक लढणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी जेजेपीने आम आदमी पार्टी म्हणजेच 'आप'शी युती केली होती. पण, त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता.