Wrestlers Protesting : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) तुरुंगात जाईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका भारतीय कुस्तीपटूंनी (Indian Wrestler) घेतली आहे. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतल्या जंतरमंतर (Jantar Mantar) इथं आंदोलन पुकारलं आहे. ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदांवरुन हटवण्यात यावं आणि त्यांची रवानगी तुरुंगात करावी अशी विनंती कुस्तीपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही केली आहे. जंतर-मंतरवर पत्रकार परिषद घेत कुस्तीपटूंनी आंदोलनापासून मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात FIR दाखल झाल्यानंतर कुस्तीपटू आंदोलन मगे घेतील असं मानलं जात होतं. पण कुस्तीपटू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदावरुन हटवण्यात येईल, सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास असल्याचं विनेश फोगाटने म्हटलं आहे. पदावर राहिल्यास ब्रिजभूषण पदाचा गैरवापर करु शकतात, आमची लढाई केवळ FIR नोंद होईलपर्यंत नाहीए, तर ब्रिजभूषणला सजा मिळेपर्यंत आहे, असं विनेश फोगाटने स्पष्ट केली आहे.
खेळाला वाचवायचं असेल तर अशा प्रवृत्तीच्या लोकांना क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवायला हवं आणि हे फक्त कुस्तीपूरतं नाही तर इतर सर्वच खेळांबद्दल होणं गरजेचं आहे. देशात खेळाचं भविष्य टिकवायचं असेल तर सर्व खेळाडूंना एकत्र यायला हवं असं आवाहनही विनेश फोगाट हिने केलं आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधआत अनेक पुरावे आहेत, हे सर्व पुरावे सुप्रीम कोर्टात देऊ कोणत्याही समितीसमोर देणार नाही अशी भूमिकाही भारतीय कुस्तीपटूंनी घेतली आहे.
ब्रिजभूषण यांच्यावर महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांना दिल्ली पोलिसांनी तात्काळ अटक करायला हवं असं कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटलं आहे. ज्या खेळाडूंचा आमच्या आंदोलनला पाठिंबा मिळतोय त्यांचे बजरंग पुनियाने आभार मानले आहे. दोन ऑलिम्पिक खेळाडूंनीही कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या प्रकरणावर पुढच्या शुक्रवारी सुनावणी होणार असून पोलिसांच्या भूमिकेचीही समीक्षा केली जाणार आहे.
कुस्तीपटूंनी केली SIT ची मागणी
भारतीय कुस्तीपटूंतर्फे ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहेत. कपिल सिब्बल यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर तब्बल 40 गुन्हे दाखल असून यात हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती सुप्रीम कोर्टात दिली. याप्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीय.
कुस्तीपटूंचे आरोप काय?
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर कारवाईची मागणी करत आहेत. अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय मनमानी कारभार करत असल्याचाही कुस्तीपटूंनी आरोप केला आहे.