चंदीगड: जागतिक योग दिनानिमित्त शुक्रवारी हरियाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला लोकांच्या हुल्लडबाजीमुळे गालबोट लागले. योग दिनानिमित्त आज संपूर्ण देशभरात योगाभ्यास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे महत्त्वाचे नेते या कार्यक्रमांना हजर होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमवेत हरियाणाच्या रोहतक येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.
हा कार्यक्रम सुरळीत पार पडला असला तरी यानंतर घडलेल्या एका प्रसंगाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या ठिकाणी आलेल्या लोकांनी कार्यक्रम संपताच आणि अमित शाह जाताच खाली योगासाठी अंथरलेल्या चटई (योगा मॅट) पळवल्या. आयोजकांकडून चटई घेऊन जाऊ नका, अशी घोषणाही केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत चटई पळवण्यासाठी लोकांमध्ये झुंबड पाहायला मिळाली.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी योगदिनानिमित्त रांची येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला ४० हजार लोक उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्वांबरोबर योग प्रात्यक्षिकेही केली. यावेळी त्यांनी योगसाधनेचे महत्त्व समजवून सांगताना म्हटले की, गेल्या हजारो वर्षांपासून योग पद्धतीत कोणताही फरक पडलेला नाही. निरोगी शरीर, मन आणि एकतेची भावना याचा योग्य मिलाफ योगक्रियेत आहे. त्यामुळे योग साधनेने माणूस समृद्ध होतो. यामुळे माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. लोकांनी केवळ आजारांवरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्याचे निराकरण कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. त्यामुळे आमचे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.