ISRO's Time-Lapse Video : Martians नावाच्या एका हॉलिवूड चित्रपटामध्ये अवकाशात ओढावलेल्या संकटामुळं एक अंतराळवीर कसा तिथंच अडकतो आणि तिथं तो कशा पद्धतीनं चक्क बटाट्याच्या शेतीचा प्रयोग करतो याचं उत्तम उदाहरण दाखवण्यात आलं आहे. काहीसा असाच प्रयोग नुकताच इस्रोनं अर्थात भारतीय अंतराळ संशोधन मंडळानं केला असून, त्याचा व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे.
इस्रोच्या या प्रयोगाअंतर्गत चवळीच्या फुगलेल्या बिया निरीक्षणासाठी ठेवण्यात आल्या. ज्यांना अवघ्या 4 दिवसांमध्येच अंकुर फुटले. किमान गुरुत्वाकर्षणाच्या ठिकाणी घेण्यात आलेला हा प्रयोग Orbital Plant Studies (CROPS) चाच एक भाग होता असं सांगितलं जात आहे.
अंतराळात शाश्वत शेतीसाठीच्या प्रयोगांअंतर्गत इस्रोनं एक पाऊल पुढे टाकल्याचं या अनोख्या यशातून आता सिद्ध होत आहे. विक्रम साराभाऊ स्पेट सेंटरमध्ये करण्यात आलेल्या या प्रयोगामध्ये नियंत्रित वातावरणात चवळीच्या 8 बिया अंकुरित करण्यात आल्या. यासाठी या बिया एका आधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणाऱ्या एका पेटीमध्ये ठेवण्यात आल्या. ज्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हाय डेफिनेशन कॅमेरा आणि तापमान, आर्द्रता आणि मातीतील ओलावा नियंत्रणात ठेवण्यासाठी सेन्सरही लावण्यात आले.
CROPS च्या या प्रयोगाअंतर्हत एका खास पद्धतीच्या मातीचा वापर करण्यात आला. जिथं या बिया अंकुरित होऊ शकतील, इस्रोनंच यासंदर्भातील माहिती दिली. या बियांच्या मातीनं पाणी शोषून घेतल्यानंतर या मातीत धीम्या गतीनं खत मिसळण्यात आलं. यामध्ये टिश्यूपेपरवर चिकटवून त्या अंतराळातील तरंगांपासून दूर ठेवण्यासाठी तेथील चेंबरमध्ये ठेवण्यात आल्या. ज्या वेळी मातीमध्ये पाणी झिरपलं तेव्हाच मॉड्यूलअंतर्गत हालचालींची नोंद सेन्सरनं ठेवण्यास सुरुवात केली. ज्यामध्य़े तापमान, आर्द्रता आणि वायूचं निरिक्षण करण्यात आलं.
Watch the timelapse of leaves emerging in space! VSSC's CROPS (Compact Research Module for Orbital Plant Studies) experiment aboard PSLV-C60 captures the fascinating growth of cowpea in microgravity. #BiologyInSpace #POEM4 #ISRO pic.twitter.com/uRUUnVGO2v
— ISRO (@isro) January 7, 2025
इस्रोचा हा प्रयोग यशस्वी झालेला असतानाच आता यापुढील टप्पाही तितकाच महत्त्वाचा असणार आहे, जिथं अंतराळात वनस्पती 30 ते 45 दिवसांपर्यंत कशा पद्धतीनं तग धरू शकतात यावर अभ्यास केला जाणार आहे. अवकाशात असे प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नसून, याआधी ISS वर नासाच्या सुनीता विलियम्स यांनी रोमेन लेट्यूस उगवत असाच एक प्रयोग केला होता. Plant Habitat-07 असं या प्रयोगाचं नाव. अवकाशातील विविध पाणीपातळी वनस्पतींच्या वाढीवर कशा पद्धतीनं परिणाम करते याचं निरीक्षण या प्रयोगादरम्यान करण्यात आलं होतं.