नवी दिल्ली: खाजगी आयुष्यातील गोष्टी बाहेर काढण्याचे बिहारच्या नेत्यांचे युद्ध शमण्याचे नाव घेत नाहीए. विषारी दारू माफियासोबत नितीशकुमार यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांचे जुने फोटो जेडीयूच्या प्रवक्त्यांनी समोर आणत तेजस्वी यादव दारू पित असल्याचे आरोप केले होते. याला तेजस्वी यांनी उत्तर दिले आहे.
याचे उत्तर तेजस्वी यादव यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे. 'नितीश काका, राजकारणाचा स्तर एवढाही खाली जाऊ देऊ नका.' असे सांगत तेजस्वी यांनी फोटोचा खुलासा केला आहे. जेडीयूच्या प्रवक्त्यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांचा एक जुना फोटो मीडियासमोर आणल्यानंतर तेजस्वी यादव चांगलेच संतापले आहेत. माझे चारित्र्य हनन करण्याचे नितीश कुमार यांचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही तर विषारी दारू माफियांसोबत त्यांचे फोटो दाखवून त्यांचा खरा चेहरा दाखविला होता.
मी जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हाचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत. तेव्हा मी आयपीएलमध्ये सहभागी होतो. सामन्यानंतर पार्टी होत असे. तेव्हाचे हे फोटो आहेत.
सध्या नितीश कुमार पूर्णपणे निराश आणि अस्वस्थ आहेत. राजकारणात पलटून वार करण्याच्या नादात त्यांनी स्वत: च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. त्यांच्याबद्दलचा राहिलेला आदरही घालविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. आम्ही खरे आहोत म्हणून समोर येऊन आरोपांना उत्तर देत आहोत. तुमच्यासारखे रोबोट समोर येत नाहीत असे म्हणत त्यांनी नितीशकुमार यांना टार्गेट केले.
मी स्वत: सर्वाचे उत्तर देतो असे सांगत जेडीयू ज्या फोंटोंचा वापर करुन मला बदनाम करायचा प्रयत्न करतेय ते फोटो २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानेही व्हायरल केल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.