मंदिरात आतषबाजीदरम्यान मोठी दुर्घटना; 150 हून अधिक लोक जखमी तर 8 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक

Kerala Fire : केरळच्या कासरगोड जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एका मंदिरात आतशबाजी करताना 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 29, 2024, 12:41 PM IST
मंदिरात आतषबाजीदरम्यान मोठी दुर्घटना; 150 हून अधिक लोक जखमी तर 8 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक  title=

सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा केरळमधील नीलेश्वरमजवळील एका मंदिरात उत्सवादरम्यान फटाके उडवल्यामुळे झालेल्या अपघातात 150 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, जखमींना कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर जुतांबलम वीरारकवू मंदिरात घडली. यावेळी 500 हून अधिक लोक पारंपारिक थ्य्यम उत्सवात सहभागी होण्यासाठी मंदिरात आले होते. यावेळी ही दुर्घटना घडली. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले घटनेचे कारण

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, "फटाक्यांची ठिणगी मंदिराच्या एका खोलीत ठेवलेल्या इतर फटाक्यांवर पडल्याने हा अपघात झाला, त्यामुळे स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून आठ जण गंभीर जखमी आहेत. या स्फोटात आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण 154 जण जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, मंदिर व्यवस्थापनाने उत्सवासाठी सुमारे 25,000 रुपये किमतीचे हलके फटाके ठेवले होते, जे मंगळवारी रात्री संपणार होते, या घटनेत जखमी झालेल्या एका तरुणीने सांगितले की, फटाक्यांच्या ठिणग्या खोलीत पडताच सर्वजण दचकले. पळू लागले. पुढे तो म्हणाला, मी आणि इतर काही जण पडलो आणि जखमी झालो, पण माझी बहीण सुखरूप बचावली.

आमदार एम. राजगोपाल यांनी व्यक्त केला शोक

स्थानिक आमदार एम. राजगोपाल यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. फटाके छोटे होते, पण ठिणग्या इतर फटाक्यांवर पडल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. कासारगोडचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी सांगितले की, मध्यरात्रीनंतर सण साजरा करण्यासाठी फटाके फोडले जात असताना ही दुर्घटना घडली. मंदिर समितीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मंदिर व्यवस्थापनाने फटाके फोडण्याचा अनिवार्य परवाना घेतला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.