नवी दिल्ली : 'निर्भया'च्या दोषींना फाशी कधी होणार? हा प्रश्न देशातील अनेकांना पडलाय. आरोपी विनय शर्माच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींकडून लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. निर्णय आल्यानंतर १४ दिवसांच्या आत फाशीची शिक्षा द्यावी लागते. फाशी देण्यासाठी बिहारच्या बक्सर येथून विशेष प्रकारचा दोरखंड मागवला जातो. पण फाशीसाठी बिहारच्या बक्सर जिल्ह्यातूनच हा दोरखंड का मागवण्यात येतो? याचं उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
आपल्या देशात देहदंडाची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीलाही मरताना अधिक त्रास होऊ नये, याचीदेखील काळजी घेतली जाते. गंगाकिनारी असलेल्या बिहारच्या बक्सर येथे बनवण्यात येणारी फाशीचा दोरखंड अतिशय मऊ आणि मजबूत असतो. हा दोरखंड बनवण्यात आल्यानंतर त्याला बराच वेळ मेणात बुडवून ठेवलं जातं. त्यामुळे फाशी देण्यावेळी इतर दोरखंडांच्या तुलनेत बक्सरच्या दोरखंडामुळे फाशीला लटकणाऱ्या व्यक्तीला कमी त्रास होतो.
तुरुंग प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक तीन महिन्यांमध्ये फाशी देण्यात येणाऱ्या जागेवर ड्राय रन केलं जातं. त्यावेळी एका डमी कैद्याला लटकावून, फाशीचं सिस्टम योग्यरित्या काम करतंय किंवा नाही याची पडताळणी केली जाते. ड्राय रनवेळी प्रत्यक्षात ज्या कैद्याला शिक्षा द्यायची असते, त्या कैद्याच्या वजनाहून दीड किलो अधिक वजन लटकावलं जातं. ड्राय रनवेळी दोरखंडाची वजन उचलण्याची क्षमताही तपासली जाते. फाशी देण्यावेळी दोरखंड तुटू नये यासाठी ही काळजी घेतली जाते.
राष्ट्रपतींकडून दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर १४ दिवसांच्या आत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. राष्ट्रपतींचा निर्णय आल्यानंतर न्यायालय फाशी देण्यासाठी ब्लॅक वॉरंट जाहीर करतं. ज्यात फाशी देण्याची तारिख आणि वेळ नमूद करण्यात येते. त्या ब्लॅक वॉरंटची एक कॉपी आरोपीलाही दिली जाते. त्यानंतर आरोपीला त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची मुभा दिली जाते.
फाशी देण्यावेळी त्या जागेवर जल्लादशिवाय केवळ चार लोक हजर असतात. जेल अधीक्षक, एसडीएम आणि दोन वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात.