बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना रडू कोसळलं आहे. सत्तेत असूनही नीलकंठाप्रमाणे विष प्यावं लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. कुमारस्वामींनी म्हटलं की, मला माहिती आहे की मी मुख्यमंत्री झालो म्हणून तुम्ही खूश आहात पण मी खूश नाही. मी नीलकंठ भगवानप्रमाणे विष पित आहे.'
कुमारस्वामी यांनी म्हटलं की, ''हे खरं आहे की मी निवडणुकीआधी मुख्यमंत्री होऊ इच्छित होतो आणि मी अनेक वचनं देखील दिली होती. पण मुख्यमंत्री होऊनही मी खूश नाही. मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करु शकतो. आज आपण जेथेही जातो लोकं माझं स्वागत करतात. लोकं म्हणतात की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने ते खूश आहेत. पण मला दु:ख याचं आहे की, आमचा पक्ष पूर्ण बहुमतात नाही. पण लोकं आमच्यावर प्रेम करतात.'' कुमारस्वामींनी जेडीएसने आयोजीत केलेल्या सन्मान सोहळ्यात ही गोष्ट बोलून दाखवली.
कुमारस्वामी यांच्या या भावूक भाषणामागे सोशल मीडिया पोस्ट असल्याचं बोललं जातं आहे. 'कुमारस्वामी आमचे मुख्यमंत्री नाही' अशी पोस्ट सध्या व्हायरल होते आहे. कोदागूमध्ये एका मुलाने ही पोस्ट टाकली होती. गावातला रस्ता वाहून गेला तरी मुख्यमंत्र्यांना यांची कोणतीही चिंता नाही. असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं. कोस्टल जिल्ह्यातील मच्छिमारांनीही कर्जमाफी न झाल्यामुळे कुमारस्वामी सरकार विरोधात आवाज उठवला आहे.
कुमारस्वामी यांनी म्हटलं की, कोणालाच माहित नाही की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी मला काय काय करावं लागलं. यानंतर मला 'अन्ना भाग्य स्कीम'मध्ये 5 ऐवजी 7 किलो तांदूळ द्यायचे आहेत. पण यासाठी 2500 कोटी कुठून आणू.? टॅक्स लावल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे. तरी देखील माध्यमं म्हणतात की माझ्या कर्जमाफीमध्ये स्पष्टता नाही. मला वाटलं तर 2 तासामध्ये मी मुख्यमंत्रीपद सोडू शकतो.'