काँग्रेसचे 3 आमदार पोलिसांच्या जाळ्यात, गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त

पोलिसांनी एका कारमधून मोठी रोकड जप्त केल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीत काँग्रेसचे आमदार होते.

Updated: Jul 30, 2022, 10:45 PM IST
काँग्रेसचे 3 आमदार पोलिसांच्या जाळ्यात, गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त title=

कोलकाता : पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शनिवारी रात्री झारखंडच्या 3 आमदारांकडून मोठी रोकड जप्त केल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोख मोजणीसाठी मशीन मागवाव्या लागल्या. हावडा शहर पोलिसांच्या दक्षिण डीसीपी प्रतीक्षा झाखरिया यांनी माहिती दिली की, राजेश कछाप, नमन विक्सेल कोंगारी आणि इरफान अन्सारी यांच्याकडून ही रोकड सापडली आहे. तिघेही झारखंड काँग्रेसचे नेते आहेत. (congress mla of jharkhand)

पोलिसांना गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्ग-16 वर एक वाहन थांबवले असता त्यात झारखंडचे तीन आमदार आढळले. त्यानंतर कारची तपासणी केली असता त्यात मोठी रोकड आढळून आली. त्यानंतर आमदारांची चौकशी केली जात आहे.

हा पैसा कुठून आला आणि कुठे नेला जात होता, असा सवाल आमदारांना केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी जामतारा येथून आमदार आहेत, तर कछाप हे रांचीमधील खिजरी येथून आमदार आहेत आणि कोंगारी हे सिमडेगा येथील कोलेबिरा येथून आमदार आहेत.

टीएमसीचे कारवाईवर प्रश्न 

आमदारांकडून रोख रक्कम जप्त केल्यानंतर, टीएमसीने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ रिट्विट केला आणि लिहिले - पूर्णपणे धक्कादायक! कारमधून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. झारखंडच्या काँग्रेस आमदारांना हावडा येथे थांबवण्यात आले. तृणमूलने प्रश्न केला की ईडी काही निवडक लोकांवरच कारवाई करत आहे का?

शिक्षक भरती घोटाळा
 
पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी सातत्याने कारवाई करत आहे. याप्रकरणी ईडीने तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. त्यांच्या अत्यंत जवळच्या अर्पिता मुखर्जीच्या अडचणीही वाढत आहेत. ती ही ईडीच्या ताब्यात आहे. या दोघांच्या ठिकाणी छापे टाकत ईडीने आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

  
शनिवारी पुन्हा एकदा ईडीची टीम अर्पिता मुखर्जीच्या डायमंड सिटीच्या घरी पोहोचली. अर्पिताच्या अनेक आलिशान गाड्या बेपत्ता झाल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे आणि त्यामुळे आता घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणार आहे.

ईडीचे म्हणणे आहे की, एक मर्सिडीज, एक होंडा सिटी, एक होंडा सीआरव्ही आणि अर्पिता मुखर्जीची एक ऑडी कार याच गृहसंकुलाच्या पार्किंग एरियात उभी होती, पण जेव्हा पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या निवासस्थानांवर एकत्र छापे टाकण्यात आले तेव्हा त्यांनी चारही कार पार्किंग एरियातून गायब केल्या आहेत.