नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पराभवाचा सामना करावा लागला आहे. असे असले तरी त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी मिळवला आहे. वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना राहुल गांधी यांनी ४ लाख २९ हजार १६१ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ही काँग्रेसच्या दृष्टीने तेवढीच एक दिलासादायक बातमी आहे. देशात मोदी वादळापुढे काँग्रेसची धुळधान उडाली आहे. काँग्रेस आघाडीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. यूपीएला १००चा आकडाही गाठता आलेला नाही.
राहुल यांना वायनाडमध्ये एकूण ७ लाख ४५५ मते मिळालीत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सीपीआयचे पी. पी. सुनीर यांना २ लाख ७१ हजार २९४ मते पडलीत. राहुल गांधी यांना अमेठीतून गुंतवून ठेवण्यासाठी भाजपकडून मोठी व्युहरचना करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी यांनी भाजपला चकवा देत दक्षिणेकडील राज्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वी झालेत. दरम्यान, अमेठीपाठोपाठ वायनाडमधून राहुल यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. केवळ मतांचे ध्रृवीकरण करण्यासाठीच राहुल वायनाडमधून निवडणूक लढवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.
दरम्यान, काँग्रेसने अमेठीतून जिंकणं कठीण असल्याचा अंदाज राहुल यांना आला होता. त्यामुळेच त्यांनी दुसरा सुरक्षित मतदारसंघ निवडला. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असे राजकीय अभ्यासकांनी आपले मत व्यक्त केले आहे.