रायबरेली : जोरदार शक्तिप्रदर्शन करत सोनिया गांधींनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. रायबरेली आणि गांधी कुटुंबीयांचं घट्ट नातं आहेच. पण याच मतदारसंघामुळे देशातली ऐतिहासिक घटना घडली होती.
गांधी सासू-सूनांचा हा मतदारसंघ. १९६७ मध्ये याच मतदारसंघातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्या होत्या. त्याआधी १९५१ मध्ये देशात पहिल्यांदा लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी फिरोज गांधींनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. १९५१ ते आजपर्यंत ३ वेळचा अपवाद सोडला तर रायबरेली काँग्रेसचीच राहिली आहे.
आणीबाणीची ठिणगी पेटली ती याच मतदारसंघातून. त्यानंतर इंदिरा गांधींचा मतदान करण्याचा हक्क याच मतदारसंघानं हिरावला होता. १९७१ मध्ये रायबरेलीमधून इंदिरा गांधींनी लोकदलाच्या राजनारायण यांचा पराभव केला. या निकालाला राजनरायण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. इंदिरा गांधींनी विजयासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप इंदिरा गांधींवर होता.
जून १९७५ मध्ये उच्च न्यायालयानं हा निकाल रद्द ठरवला. त्याविरोधात इंदिरा गांधी सर्वोच्च न्यायालयात गेल्या. इंदिरा गांधी संसदेच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतील पण मतदान करु शकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं २४ जून १९७५ ला हा ऐतिहासिक निर्णय दिला होता.
त्यानंतर विरोधकांनी इंदिरा गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. दुसऱ्याच दिवशी जयप्रकाश नारायण यांची दिल्लीतल्या रामलीला मैदानात सभा झाली. या रॅलीनंतर २५ जून १९७५ ची ती मध्यरात्री इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती.
सासूबांईंचा हा मतदारसंघ त्यांच्या सूनेकडे आला तो २००४ मध्ये. सोनिया गांधी २००४ मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्यानं विजयी झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत सोनियांना रायबरेलीनं भक्कम साथ दिली आहे. आता पुन्हा सोनिया इथून रिंगणात आहेत.
रायबरेलीमधून इंदिरा गांधी, सोनिया गांधींसह इंदिरांचे भाचे अरुण नेहरू आणि मामी शीला कौलही खासदार झाल्या. आता तो वारसा सोनियांकडे आहे. ही निवडणूक सोनियांची शेवटची निवडणूक असल्याचं बोललं जातं आहे. त्यानंतर आता रायबरेलीचा वारसा पुढे कोण सांभाळणार याची उत्सुकता आहे.