मुंबई : लोकसभा निवडणूक २०१० दरम्यान मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून भाजपनं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचं नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय. साध्वी प्रज्ञा हिला हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखलं जातं. भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार आहे. या दरम्यान विचारवंत आणि प्रसिद्ध गीतकार - लेखक जावेद अख्तर यांनी भाजपाद्वारे प्रज्ञा ठाकूर हिला उमेदवारी देण्यावर 'वाह...वाह...वाह' म्हणत भाजपाच्या नीती-धोरणांवर टीप्पणी केलीय.
'भोपाळमध्ये भाजप उमेदवाराची निवड खरोखरंच दोषरहित आहे. साध्वी प्रज्ञा, संघ परिवाराच्या विचारांसाठी आणि कार्यांसाठी अगदी योग्य व्यक्ती आहे. वाह...वाह...वाह' असं आपल्या ट्विटमध्ये म्हणत जावेद अख्तर यांनी टीका केलीय.
दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह हिनं बुधवारी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यावर सनातन धर्माला अपमानित करण्याचा आरोप केला. आपण भगव्याला सन्मान मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचंही तिनं म्हटलंय.
दुसरीकडे, काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा यांचे स्वागत करत एक खास संदेशही सोशल मीडियावरून शेअर केलाय. 'भोपाळसारख्या रमणीय शहराचा शांत, सुक्षिशित आणि सभ्य वातावरण तुम्हाला आवडेल. आपण सगळे सत्य, अहिंसा आणि धर्माच्या मार्गाने वाटचाल करू, असा आशीर्वाद मी नर्मदा मातेकडे मागतो', असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा ठाकूर हिच्याविरुद्ध गैर-कायदेशीर क्रिया प्रतिबंध (यूएपीए अॅक्ट) कायद्यानुसार प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. यावर बोलताना, आपल्याला क्लीन चिट मिळाल्याचा दावाही प्रज्ञा सिंह हिनं माध्यमांशी बोलताना केला. भोपाळच्या जागेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे.